आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत, त्यामुळे आता भेटींचा सिलसिला सुरू राहील; प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची नुकतीच भेट घेतली होती. त्या भेटीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत. त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

पुण्यात भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांच्या भेटीवर प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत, अनौपचारिक, औपचारिक कुठे ना कुठे, कधी ना कधी भेट होणारच आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात आता काही अर्थ राहिला नाही. आम्ही लवकरच एकत्र येणार असल्याने वारंवार भेटीगाठी होत राहणार आहेत, असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे.आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक सहमतीचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. ज्यादिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो त्यानंतर या पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात देशाला कसे कमजेर केले आहे याचा आराखडा आम्ही मांडू असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सत्तेत येणे, संविधान वाचवणे हा आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. त्याचसोबत मराठा आणि ओबीसी समाजात जे भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते वाढणार नाही आणि त्यातून योग्य तोडगा निघेल. तसेच महाराष्ट्राची शांतता जशी आहे तशी राहिले हे पाहणे हादेखील आमचा नव्या वर्षाचा संकल्प आहे असं आंबेडकरांनी सांगितले. 2024 या वर्षांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. तसेच महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांनीच भाष्य करत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.