तंबाखू देण्यास नकार दिल्याने काकाने पुतण्यावर केला कुऱ्हाडीने वार

संतापाच्या भरात टोकाचे पाऊल उचलल्याचे अनेकदा ऐकीवात आले आहे. असाच एक भयंकर प्रकार मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात घडला आहे. येथील 30 वर्षीय तरूणाने संतापाच्या भरात त्याच्या मोठ्या भावाच्या मुलावर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये पाच वर्षांच्या पुतण्याचा मृत्यू झाला आहे.

शहडोलमधील रहिवासी रमला कोल (30) याने भावाच्या बायकोजवळ तंबाखू मागितला होता. मात्र तंबाखूचे साहित्य घरी नसल्याचे सांगून तिने देण्यास नकार दिला. तिने तंबाखू देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास रमलाने मोठ्या भावाच्या घरी घुसून भावजय आणि पुतण्या झोपेत असताना त्यांच्या कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात पुतण्याचा जागीच मृत्यू झाला तर महिला जखमी झाली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.