लवकरच बाहेर भेटूया! मनिष सिसोदिया यांचे तिहार तुरुंगातून समर्थकांना पत्र

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया सध्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते तुरुंगात असून आता तुरुंगातूनच त्यांनी आपल्या पटपरगंज या मतदारसंघातील जनतेला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘लवकरच बाहेर भेटूया’, असे म्हटले आहे. त्यामुळे संजय सिंह यांच्याप्रमाणेच सिसोदिया हे देखील लवकरच तुरुंगाबाहेर येण्याच्या ‘आप’ कार्यकर्त्यांच्या पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्या एक वर्षात तुम्हा सर्वांचे खुप आठवण आली. सर्वांना खुप प्रामाणिकपणे मिळून मिसळून काम केले. स्वातंत्र्यलढ्यावेळी जसा लढा दिला तसेच आपण चांगले शिक्षण आणि चांगल्या शाळांसाठी लढतोय, असे सिसोदिया पत्रात म्हणाले.

ते पुढे लिहितात, इंग्लंजांच्या हुकुमशाही आणि जुलमी राजवटीनंतरही आपल्या स्वातंत्र्यांचे स्वप्न झाले. त्याप्रमाणेच एक दिवस प्रत्येक मुलाला योग्य आणि चांगले शिक्षण मिळेल. इंग्लंजांनाही वाटायचे की आपल्या सत्तेचा सूर्य कधी मावळणार नाही. ते देखील खोटे बोलून लोकांना तुरुंगात डांबायचे. इंग्लंडने अनेक वर्ष महात्मा गांधी यांना तुरुंगात ठेवले, नेल्सन मंडेला यांना तुरुंगात ठेवले. त्यांना वाटायचे की तुरुंगाच्या भिंती स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करेल. पण गांधी नावाचा सूर्य कधी मावळला नाही.

देश विकसित होण्यासाठी चांगले शिक्षण, शाळा आवश्यक आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये शिक्षणाची क्रांती झाली याची मला आनंद आहे. आता पंजाबमध्येही शिक्षणाची क्रांती होतेय हे पाहून दिलासा मिळतोय, असेही सिसोदिया यांनी म्हटले. तसेच शेवटी त्यांनी पत्नीची काळजी घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले आणि लवकरच बाहेर भेटू असेही म्हटले.