एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांची चाचणी होणार

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन कंपन्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने आता संबंधित मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये कॉर्सिनोजेनिक पेस्टिसाईड असलेल्या एथिलीन ऑक्साईडचं प्रमाण जास्त आढळल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या कीटकनाशकामुळे कर्करोगाचा धोका बळावतो. हाँगकाँगच्या अन्नसुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमडीएच मसाल्यांच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला आणि करी मसाला या तीन मसाल्यांमध्ये हे कीटकनाशक प्रमाणापेक्षा अधिक आढळलं आहे. तर एवरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे जास्त प्रमाणात आढळलं आहे.

देशातील फूड कमिशनर्सना याबाबत माहिती देण्यात आली असून मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांत एमडीएच, एव्हरेस्टसह देशातील सर्व कंपन्यांकडून मसाल्यांचे नमुने गोळा करण्यात येतील. त्यानंतर 20 दिवसांच्या आत त्यांचे अहवाल प्राप्त होतील. जर त्या मसाल्यांमध्ये हानिकारक घटक आढळले तर कठोर कारवाई केली जाईल.