मिरजेत दारुड्या मुलाचा बापाकडून खून

मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून बापानेच मुलाचे कटरने तुकडे करून त्याचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. दरम्यान, दुपारी बाप स्वतःहून मिरज शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. मुलाच्या मृतदेहाचे तुकडे त्याने मिरजेसह सुभाषनगर येथे टाकल्याची कबुली दिल्याची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.

रोहित राजेंद्र हंडीफोड (वय 26, रा. मिरज) असे मृत मुलाचे नाव आहे. राजेंद्र यलाप्पा हंडीफोड (वय 51) असे वडिलांचे नाव आहे. हंडीफोड कुटुंब मिरजेतील गणेश तलाव परिसरात राहतात. राजेंद्र यांचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. घरी राजेंद्र, त्यांची पत्नी आणि मुलगा रोहित राहतात. राजेंद्र यांच्या मुलीचा विवाह झाला असून, ती सासरी राहते. रोहित कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. या व्यसनामुळे तो बरेच दिवस घरीही जात नव्हता. त्याच्या व्यसनाला कुटुंबीय कंटाळले होते.

संशयित राजेंद्र यांची पत्नी माहेरी गेली होती. गुरुवारी सकाळी घरात कोणीही नसल्याचे पाहून राजेंद्र यांनी नशेत असणाऱया मुलाचा खून केला. त्यानंतर घरातील बाथरूममध्ये त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. राजेंद्र यांनी तुकडे केलेले हात-पाय जवळील गणेश तलावात फेकले, तर उर्वरित धड सुभाषनगर येथील शेतात टाकून दिले. या कृत्यामुळे राजेंद्र अस्वस्थ होते. शुक्रवारी त्यांनी माहिती मेहुण्याला दिली. त्यानंतर त्यांचा मेहुणा त्यांना घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पथके पाठविली.

दोन दिवसांपूर्वी खरेदी केले कटर

मुलगा रोहित याच्या दारूच्या व्यसनाला त्याचे कुटुंबीय कंटाळले होते. पत्नी माहेरी गेल्यानंतर राजेंद्र हंडीफोड यांनी दोन दिवसांपूर्वी बाजारातून कटर खरेदी केले होते. मुलाला संपवायचेच, या हेतूनेच त्यांनी ते खरेदी केले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलीस तपास करीत आहेत.