30 वर्षांचे स्वप्न होणार साकार; सरस्वती देवी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोडणार मौनव्रत

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. याच दिवशी झारखंडमधील एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. 1992 मध्ये ज्या दिवशी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला, त्या दिवसापासून या वृद्ध महिलेने रामलल्ला जोपर्यंत मंदीरात विराजमान होणार नाहीत तोपर्यंत मौन व्रत ठेवण्याचा 30 वर्षापूर्वी संकल्प केला होता.

सरस्वती देवी असे झारखंडमधील या वृद्ध महिलेचे नाव आहे. देवी यांना एकूण आठ मुलगे आणि चार मुली आहेत. 1986 साली सरस्वती देवी यांचा पती देवकीनंदन अग्रवाल यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपले जीवन भगवान रामाला समर्पित केले.सरस्वती देवींना अयोध्येत मौनी माता म्हणून ओळखले जाते. त्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत सांकेतिक भाषेत संवाद साधतात. सरस्वती देवींनी त्यांच्य़ा या मौन व्रतामधून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. यानंतर 2020 पर्यंत त्या रोज दुपारी एक तास व्रत सोडायच्या. मात्र ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराची पायाभरणी केली त्य़ा दिवसापासून सरस्वती देवींनी पुन्हा मौन व्रत धारण केले.

सरस्वती देवींचा धाकटा मुलगा हरेराम अग्रवालने सांगितले की, ‘जेव्हा 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा माझ्या आईने अयोध्येत राम मंदिर निर्माण होईपर्यंत मौन बाळगण्याची शपथ घेतली होती. मंदिरात अभिषेकाची तारीख जाहीर झाल्यापासून ती खूप आनंदी आहे. कारण तिचे स्वप्न आता पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.

22 जानेवारी हा दिवस सर्वांच्य़ा आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असणार आहे. प्रभू श्री राम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच सरस्वती देवी अयोध्येत मौन व्रत सोडणार आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सरस्वती देवी सोमवारीच रात्री रेल्वेतून अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. देवी यांना राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महंत नृत्य गोपाल दास यांच्या शिष्यांनी आमंत्रित केले आहे.