तंबाखूसाठी चुलत्याने 5 वर्षाच्या पुतण्याला कुऱ्हाडीने संपवलं! वहिनी गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तंबाखू दिला नाही म्हणून एका काकाने पाच वर्षांच्या पुतण्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्याला संपवल. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

रामला कोल (30) असे या आरोपीचे नाव आहे. हे प्रकरण बेओहारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरकच गावातील आहे. ही घटना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. रमला कोळ याची वहिनी सुखीबाई आणि तिचा मुलगा गाढ झोपेत होते. याचवेळी रमलाने वहिनी सुखीबाईला झोपेतून उठवून तिच्याकडे तंबाखू मागितला. वहिनीने तंबाखू देण्यास नकार दिला. तंबाखू दिला नाही म्हणून रामला याला राग अनावर झाला. याच रागात येऊन रामलाने झोपेत असणाऱ्या मायलेकावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.यामध्ये पाच वर्षांच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. तर वहिनी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस अधिकारी मोहन पडवार यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की, रमला कोल याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला असून त्याची आई गंभीर जखमी आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय इतर कलमाअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.