चेन्नईला लाभला नवा ‘किंग’, ऋतुराज गायकवाड धोनीचा नवा वारसदार

आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपरकिंग्जचा (सीएसके)  नवा किंग (कर्णधार) बनलाय. गत आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा अपयशी ठरल्यामुळे महेंद्रसिंग धोनीने नव्या दमाच्या ऋतुराज गायकवाडकडे सीएसके संघाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. कर्णधारांच्या पह्टोशूटनंतर चेन्नई संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ऋतुराजच्या कर्णधारपदाची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले असल्याने ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. शिवाय आयपीएलमध्ये 2019 मध्ये पदार्पण केल्यापासून या सलामीच्या फलंदाजाने कामगिरीत कमालीचे सातत्य राखले आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच धोनीने ऋतुराजला आपला वारसदार बनविण्याचा निर्णय घेतला. धोनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘यावेळी तुम्ही मला एका नवीन भूमिकेत पाहणार आहात’ अशी पोस्ट केली होती. त्यामुळे यंदा धोनी सीएसकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना दिसणार असून ऋतुराज त्याच्या देखरेखीखाली कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

चेन्नईला पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱया महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022च्या हंगामातही सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजाला कर्णधार बनवण्यात आले, मात्र जाडेजा ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही आणि संघाला साखळी सामन्यांमध्येच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले.