Mumbai crime news – टिकटॉक स्टार बनला चोर, तुरुंगातून बाहेर येताच करू लागला चोऱ्या

ऑनलाईन कॅसिनो गेम खेळायला पैसे हवे असल्याने चोऱ्या करणाऱ्या टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू गुप्ता असे त्याचे नाव आहे. चोरी केल्यावर तो विमानाने रांची येथे गेला होता. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

साकीनाका येथे तक्रारदार राहत असून त्याची दोन घरे आहेत. दहा दिवसांपूर्वी ते दुसऱ्या घरी गेले होते. त्याने त्या घरात काही पैसे ठेवले होते. त्या रात्री ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. पहाटे ते घरी आले. तेव्हा त्यांना दरवाजाचे टाळे तुटलेले दिसले. याची माहिती त्यांनी साकीनाका पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

परिमंडळ-10चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकातील उपनिरीक्षक राजेंद्र नागरे, कदम, शेख, करांडे, सौंदरमल, शिगवण, पिसाळ आदी पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

एका फुटेजमध्ये गुप्ता दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. गुप्ताला पोलिसांनी रांची येथून ताब्यात घेतले. गुप्ता हा सिव्हिल इंजिनीअर म्हणून एका ठिकाणी कामाला होता. नोकरी सुटल्यावर तो व्हिडीओ बनवून टिकटॉकवर अपलोड करू लागला. टिकटॉक बंद झाल्यावर त्याला ऑनलाईन कॅसिनोचा नाद लागला. ऑनलाईन कॅसिनोच्या आहारी गेल्याने तो गेम खेळण्यासाठी चोऱ्या करू लागला.

चोरी केल्यावर विमानाने गेला 

तक्रारदार याच्या घरी चोरी केल्यावर तो एका हॉटेलमध्ये गेला. तेथे त्याने विमानाचे ऑनलाईन तिकीट बुक केले. तिकीट बुक केल्यावर पहाटे विमानाने तो रांची येथे गेला. गुप्ताचे सोशल मीडियावर अकाउंट असून त्याचे अनेक फोल्लोअर्सदेखील आहेत.  गुप्ता हा काही महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर येताच तो पुन्हा चोऱ्या करू लागला.