मुंबईत उन्हाचे चटके; घामाच्या धारा

 

मुंबईचा पारा 34 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. तरीही उन्हाचे प्रचंड चटके आणि अंगातून घामाच्या धारा अशी स्थिती होती. अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे आर्द्रतायुक्त वारे मुंबईच्या दिशेने वाहत आहेत. त्यातच उन्हाच्या चटक्यांमुळे असह्य उकाडा जाणवत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मुंबईत बहुतांश ठिकाणी 33 ते 34 अंश तापमानाची नोंद झाली. बोरिवलीत 34, चेंबूर आणि कुलाबा 33, मुलुंड आणि पवईत 34 तर वरळीत 33 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मे महिन्यात पारा आणखी चढणार असून उकाडा आणखी वाढेल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 यादरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नये. लहान मुलांना घराबाहेर नेऊ नये. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना टोपी किंवा महिलांनी डोके आणि तोंडाभोवती स्कार्प गुंडाळावा असे आवाहन डॉक्टर तसेच हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी केले आहे.

विदर्भही तापला

विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून नागपूरकरांनी तर भट्टी झाल्यासारख्या उन्हाच्या झळा सोसल्याचे चित्र आज होते. विदर्भात सर्वाधिक ब्रम्हपुरी येथे 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उद्यापासून विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात आज तब्बल दहा जिह्यांचे तापमान 40 अंशाहून अधिक होते. नागपूरमध्ये 42.6 अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 43.2, वर्ध्यात 43.5 तर वाशीममध्ये 43.4 आणि अमरावती येथे 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, विदर्भात उद्यापासून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि वर्धा या पाच जिह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाळी वातावरण राहील असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.