मोदी के नाम पर दे दे बाबा! अशीच भाजप नेत्यांची भाषा; नाना पटोलेंचा सणसणीत टोला

Lok Sabha Election 2024: च्या पार्श्वभूमीवर विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आता सज्ज झाली आहे. मंगळवारी मुंबईमधील नरिमन पाँइट येथील शिवालय येथे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील हुकूमशाही पद्धतीनं कारभार करणाऱ्या मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘राज्यातील आणि केंद्रातील सरकार भ्रष्टाचारी आहे, असं म्हणतानाच सामाजिक न्यायाचा आणि देशातल्या प्रत्येक बहुजनांचा, सोशिक पीडितांचा जो अधिकार आहे असा सर्वसमावेशक जाहीरानामा काँग्रेसने प्रसिद्ध केल्याचं ते म्हणाले. त्याबद्दल राहूल गांधीनी जी भूमिका मांडली त्याला मुस्लीम लीगसोबत जोडण्याचे काय कारण आहे? असा सवाल त्यांनी केला. भाजप चुकीच्या गोष्टींना पुढे करत मुस्लीम लीगशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून यांची पातळी किती घसरली आहे हे जनता बघत आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी मोदी सरकारचा सणसणीत शब्दात समाचार घेतला.

पत्रकार परिषदेत बोलताना, ‘काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसच मोठ योगदान आहे हे वेगळे सांगायला नको. केंद्रातील तानशाही सरकार राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत कसे वागले याची जनतेला कल्पना आहे. सोनिया गांधीची तब्येत बरी नसताना देखील त्यांना ईडी ऑफिसमध्ये तासनतास बसवून ठेवले होते. केंद्र सरकारच्या या तानाशाही प्रवृत्ती विरोधात देशातील विविध पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची सुरूवात केली. या आघाडीचे मुख्य उद्दीष्ट्य मोदी सरकार, भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढून जनतेला दिलासा देण्याचे आहे. मुस्लीम लीगने या देशाला तोडले, फाळणी केली. हिंदू महासभेचे देखील देशाच्या फाळणीमध्ये मोठे योगदान असल्याचे पटोले यांनी म्हटले. पुढे, मुस्लीम लीगचा उल्लेख करण्यामागचा यांचा उद्देश्य वेगळा आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नसावी ही भाजपची मानसिकता आहे, आणि हे काल नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून स्पष्ट झाले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. सोमवारी नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर येथे सभा झाली. त्यांचे भाषण सुरू असताना लोकं उठून गेली. याबद्दल बोलताना, मोंदीचे रटाळ भाषण याला कारणीभूत असल्याचे पटोले म्हणाले. भाषणादरम्यान कायम काँग्रेसला शिव्या देणं, मुस्लिमांना शिव्या देणं याचा जनतेला कंटाळा आला असल्याचं त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावर मोदी का बोलले नाही? असा सवाल देखील त्यांनी केला. त्याचबरोबर महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर ते कधीही बोलत नाहीत कारण हे प्रश्न त्यांचा विषयच नाही. देशाच्या पंतप्रधानांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत, असे पटोले यांनी सांगितले.

निवडणूकांबद्दल बोलताना, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एकत्रितपणे ही लढाई लढतील, आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडूण येतील. तसेच ‘आमचं सविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी ही लढाई आहे आणि महाराष्ट्रामध्ये मत विभागणीचं राजकारण भाजप करत आहे त्यामुळे अशी परिस्थिती इथे आली आहे, असंही ते म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निर्माण केलेली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं आणि केंद्रिय तपास यंत्रणेचा दुरूपयोग करून, सत्तेचा दुरूपयोग करून शिवसेनेला तोडायचं या गोष्टी कार्यकर्ते विसणार नाहीत. या राजकारणाला आता पूर्णविराम लागणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्र कशाला मत देईल?

राज्यातील परिस्थितीवर बोलताना, महायुतीचे उमेदवार आणि नेते, नरेंद्र मोंदींसाठी मत मागतायेत ती कशासाठी? नरेंद्र मोदी यांना मतदान करा असं भाषण राज्यातले नेते आणि त्यांचे उमेदवार करतायेत. ‘अल्लाह के नाम पर दे दे बाबा’ याप्रमाणे राज्यातील भाजप नेत्यांची परिस्थिती दिसत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. देशाच्या पंतप्रधानांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत. गरीब, बेरोजगार, शेतकरी कुणीच सुखी नाहीत मग कशाला मागायची यांच्यासाठी मते आणि नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्र कशाला मत देईल? असा सवाल नाना पटोले यांनी केला.