‘पीएफआय’प्रकरणी ‘एनआयए’ व ‘एटीएस’ची छापेमारी, बिहारच्या दरभंगा येथून संशयित अटकेत

पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाप्रकरणी (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बिहारमध्ये छापेमारी केली. यामध्ये दरभंगा व पाटणा येथे केलेल्या छापेमारीत एका संशयितास अटक करण्यात आली. आज रविवारी पहाटे 5 वाजता पथकाने दोन्ही ठिकाणी एकाच वेळी चार तास कारवाई केल्याने खळबळ उडाली.

एनआयए व एटीएसने दिलेल्या माहितीप्रमाणे, दरभंगामध्ये गजियाना गाव आणि छोटकी बाजार येथे पथकाने कारवाई केली. छोटकी बाजार येथून एका संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो पाटण्यातील मदरशात राहून शिक्षण घेत होता. संशयित तरुण अरबी भाषेचे भाषांतर करत असल्याने आयएसआयशी संबंध असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. यानंतर हा छापा मारत पथकाने येथून 2 मोबाईल आणि बँक डिटेल्सही घेतले आहेत.

पथकाच्या छाप्यादरम्यान उपस्थित असलेले मोहम्मद एम.डी. आलम यांनी सांगितले की, येथे पुस्तकांचे दुकान आहे. हे दुकान मोहम्मद कासमी यांचे असून, उर्दू अरबी पुस्तके येथे उपलब्ध आहेत. पथक पुस्तकांमध्ये काहीतरी शोधत होते, परंतु त्यांना काहीही सापडले नाही. कासमी साहेबांना आपण चांगले ओळखतो, ते तसे नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतून अटक करण्यात आलेल्या मुमताज अन्सारीच्या चौकशीत मिळालेल्या सुगाव्याआधारे ही कारवाई करण्यात येत आहे.

मुमताज अन्सारी ही बिहारमधील पश्चिम चंपारण जिह्यातील महिशी पोलीस ठाणे परिसरात राहणारी आहे. पीएफआय प्रकरणात पाटणाच्या फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात एफआयआरप्रकरणी ती हवी होती. हे प्रकरण एनआयएने ताब्यात घेतल्यानंतरही मुमताज पकडली गेली नाही. बिहार एटीएसला त्याची खास माहिती मिळाल्यानंतर एक टीम तामिळनाडूला गेली. टीम तिरुवल्लूर जिह्यातील बरियापल्लम येथे सुमारे 10 दिवस थांबली होती. तिथे मुमताज लपून ओळख बदलून राहत होती. ती तेथील एका कारखान्यात कामाला असताना 19 जून रोजी बिहार एटीएसच्या पथकाने तिला अटक केली. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपविल्यानंतर चौकशी झाली.