पुड्यात 1 बिस्कीट कमी होते, ITC कंपनीला 1 लाखांचा दंड

चेन्नईमधील एका ग्राहकाच्या सजगतेमुळे बिस्कीट कंपनीला चांगलाच धडा मिळाला आहे. ITC लिमिटेड या बिस्किट निर्मिती करणाऱ्या कंपनीला ग्राहक न्यायालयाने नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या कंपनीच्या बिस्किटाच्या पुड्यामध्ये एक बिस्कीट कमी होते. ज्याबाबत ग्राहकाने तक्रार केली होती. या ग्राहकाची तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास आल्याने आयटीसी कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे,  तसेच, न्यायालयाने बिस्किटांच्या त्या विशिष्ट बॅचची विक्री बंद केली आहे.

चेन्नईच्या एमएमडीए माथुर केपी दिलीबाबू यांनी भटक्या कुत्र्यांसाठी 2021 साली सनफिस्ट मारी लाईट बिस्कीटाचे दोन डझन पुडे दुकानातून खरेदी केले होते. त्यांनी जेव्हा कुत्र्यांना बिस्कीटे खायला घालण्यासाठी ते पुडे उघडले त्यावेळी त्यात 15 बिस्कीटे होती, मात्र पुड्यावर 16 बिस्कीटांचा उल्लेख होता. त्यानंतर दिलीबाबू बिस्कीटाचे पुडे घेऊन त्या दुकानात गेले तसेच त्यांनी आयटीसी कंपनीकडेही याबाबत जाब विचारला होता. मात्र त्यांना तिथे समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. प्रत्येक बिस्किटाची किंमत 75 पैसे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. आयटीसी लिमिटेडने दिवसाला सुमारे 50 लाख पॅकेट्सचे उत्पादन केले आणि लिफाफ्याच्या मागील हिशोबानुसार कंपनीने 29 लाख रुपयांहून अधिक लोकांची फसवणूक केली आहे असा दावा दिलीबाबू यांनी केला होता. तर यावर उत्तर देताना कंपनीने सांगितले की, बिस्कीटाच्या वजनावर बिस्कीटाचा पुडा भरला जातो, संख्या बघून बिस्कीटे भरली जात नाहीत. त्यामुळे बिस्कीट पुड्यात भरताना 76 ग्रॅम बिस्कीटे भरली जातात. त्यानंतर आयोगाने जेव्हा बिस्कीटाच्या पुड्याचे वजन केलेतेव्हा ते 74 ग्रॅम इतके निघाले होते.

आयटीसी कंपनीच्या वकिलांनी सांगितले की, 2011 च्या कायदेशीर मेट्रोलॉजी नियमांनी प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंच्या बाबतीत जास्तीत जास्त 4.5 ग्रॅम त्रुटी ही ग्राह्य धरली जाऊ शकते. मात्र त्यांचा हा युक्तिवाद ग्राहक न्यायालयाने ग्राह्य धरला नाही. अशा प्रकारच्या सवलती या बिस्किटांसारख्या वस्तूंना लागू होऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले होते. बिस्कीटाचे वजन निश्चित असते ते बदलत नाही त्यामुळे ही गोष्ट बिस्कीटासाठी लागू होत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

बिस्कीटाचे पुडे हे संख्येवर नाही तर वजनावर विकले गेले असल्याचा युक्तिवादही न्यायालयाने अमान्य केला कारण बिस्कीटाच्या पुड्यावर बिस्कीटांची संख्या लिहिलेली होती. त्यामुळे  29 ऑगस्ट रोजी ग्राहक न्यायालयाने आयटीसीला कंपनीला 1 लाख रुपये दंड ठोठावला होता.