मेट्रोत महिलेचा विनयभंग करणारा अटकेत

मुंबई मेट्रोत महिलेचा विनयभंग करणाऱयाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. शरद नायर असे त्याचे नाव आहे. बीएसई नार्ंसगचे शिक्षण घेतलेला शरद हा मुंबईत मुलाखतीसाठी आला होता. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला या साकीनाका परिसरात राहतात. रविवारी सायंकाळी त्या मेट्रोने प्रवास करत होत्या. त्या साकीनाका मेट्रोच्या गेट नंबर दोन येथून जात होत्या. तेव्हा शरदने महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्य केले. या प्रकरणी महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे याच्या पथकातील उपनिरीक्षक किशोर परकाळे, पेडणेकर, सूर्यवंशी, सोनजे, जाधव, लोंढे, कापसे, मोरे, पिसाळ याच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासासाठी दोन पथके तयार केली. पोलिसांनी मेट्रो स्थानक परिसरातील 50-60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर साकीनाका परिसरातील 20-25 डॉमेट्रीमध्ये जाऊन तपासणी केली. शरद हा एका डॉमेट्रीत राहत असल्याचे समजले. तो आज पुन्हा केरळला जाणार असल्याची माहिती समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी शरदला ताब्यात घेऊन अटक केली.