कासीम खान मशिदीतील चोरीची पोलिसांनी केली उकल; छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन मुलगा ताब्यात

नगर शहरातील कासीम खान मशिदीमधील चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. धर्म शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलानेच मशिदीत चोरी केल्याचे उघड झाले आहे. या चोरीच्या गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन मुलाचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवस तपासात सातत्य ठेवल्याने या चोरीची उकल शक्य झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

कासीम खान मशिदीत 28 नोव्हेंबरला चोरी झाली होती. मशिदीमधील कार्यालयात असलेले कपाट ड्रील मशिनने तोडले होते. कपाटातून 77 हजार 105 रुपयांची रोकड चोरीला गेली होती. मुश्ताक अब्बास पठाण (वय 50, रा. सीआयव्ही सोसायटी, मुकुंदनगर) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. मशिदीत चोरी झाल्याने त्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या पथकासह मशिदीत झालेल्या चोरीच्या स्थळाची बारकाईने तपासणी केली. यात काही बाबींची त्यांनी नोंद केली. यानंतर मशिदीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर आगोदरच कट केली असल्याने चित्रीकरण होऊ शकले नाही. मशीदीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना तपासाला पूरक माहिती मिळाली.

सीसीटीव्हीचे कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. यात गुन्ह्याशी निगडीत बरेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यानंतर गुन्ह्याच्या उकलीसाठी तपास पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले. तेथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. अल्पयवीन मुलाकडे चौकशी केल्यावर त्याने पोलीस चौकशीत चोरीची माहिती दिली. मशिदीतून चोरलेली 77 हजार रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले कटर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक ए. पी. इनामदार करत आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी नातेवाईकांकडून विधीसंघर्षग्रस्त बालकाने काही रक्कम घेतली होती. ती रक्कम हरल्यानंतर नातेवाईकांचे घेतलेले पैसे देण्यासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.