सूरज चव्हाण यांचा खिचडी वितरणाशी काहीही संबंध नाही ईडीची कबुली; 22 जानेवारीपर्यंत कोठडी

 

तथाकथित खिचडी घोटाळय़ाप्रकरणी अटक केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांचा खिचडी वितरणाशी काहीही संबंध नाही, अशी कबुली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिली आहे. रिमांड अर्जात ही कबुली देत ईडीने चव्हाण यांच्या चौकशीसाठी आठ दिवस कोठडीची मागणी विशेष न्यायालयात केली. न्यायालयाने चव्हाण यांना 22 जानेवारी 2024 पर्यंत ईडी कोठडी सुनावली.

चव्हाण यांना कोठडीत औषधे देण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली. चव्हाण यांना कोठडीत काही मुभा देण्याचे आदेश ईडीला देण्यात आले आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. बुधवारी ईडीने चव्हाण यांना अटक केली. चौकशीसाठी कोठडी मिळावी यासाठी चव्हाण यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी ईडीचे वकील सुनील गोन्सालवीस यांनी चव्हाण यांच्या अधिक चौकशीसाठी त्यांची ईडी कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी केली.

चव्हाण यांचे वकील हर्षद बडबडे यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. चव्हाण यांची अटकच बेकायदा आहे. त्यांचा तथाकथित घोटाळय़ाशी काहीही संबंध नाही. ईडीची मागणी मान्य करू नये, अशी विनंती ऍड. बडबडे यांनी केली.
मुळात कोरोना काळात महापालिकेने खिचडीचे कंत्राट काढले. निविदा मागवल्या. कंपन्यांना पालिकेत बोलावले. त्यानंतर कंत्राटदाराची नेमणूक केली ही बाब विश्वासार्ह नाही. कारण त्या वेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचवणे पालिकेची जबाबदारी होती. असे असताना कंत्राट कसे देता येईल, असा सवाल ऍड. बडबडे यांनी केला.

मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकला नाही म्हणून सूरजला सतातावहेत
शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाचे सचिक सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर ‘एक्स’ सोशल मीडियाकर आपली प्रतिक्रिया दिली. मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकला नाही म्हणून सूरजला सतावले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ‘जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर… अशीच ही मिंधे राजवट…’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सूरज चव्हाण हे देशभक्त असल्यामुळेच भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत. नाहीतर प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते, असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन… सच्चा दिलाचा सूरज आहे, अशा भावना व्यक्त करतानाच, आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू! लोकशाही, सत्य, संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच! असा ठाम विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पोस्टच्या शेवटी ‘महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे!’ असा इशाराही त्यांनी मिंधे आणि भाजपला दिला आहे.

ईडीचा युक्तिवाद

  • सूरज चव्हाण यांना राजकीय पाठबळ असल्याने महापालिकेने त्यांना खिचडीचे कंत्राट दिले.
  • खिचडीचे कंत्राट 8.64 कोटींचे होते.
  • हा घोटाळा 6.3 कोटींचा आहे.
  • सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात 1.35 कोटी जमा कसे झाले हे शोधायचे आहे.
  • 16.30 रुपयांची खिचडी 33 रुपयांना विकली. पैशातील हा फरक कसा आला आणि या पैशाचे काय केले याचा तपास करायचा आहे.
  • या घोटाळय़ातील कागदपत्रे, बँक खाती व अन्य कोणत्या आरोपीचा गुह्यात सहभाग आहे का, याची चौकशी करायची आहे.

सूरज चव्हाण यांचा दावा
राजकीय पक्षांशी निगडित असणे गुन्हा आहे का?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संशयित आरोपी दोषी आहे की नाही हे तपास अधिकाऱयाने तपासायला हवे. त्यानंतरच अटक करावी. सूरज चव्हाण कोणत्या गुह्यासाठी दोषी आहेत हे रिमांड अर्जात नमूद नाही.

संशयित आरोपीकडे काही मुद्देमाल असेल किंवा कागदपत्रे आहेत आणि तो देत नसेल तर अटक करता येते. सूरज चव्हाण यांच्याकडे कोणती कागदपत्रे किंवा मुद्देमाल आहे आणि ते देत नाहीत, असा काही तपशील रिमांड अर्जात नाही.

संशयित आरोपी प्रश्नांची उत्तरे देत नाही म्हणून त्याला अटक करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सूरज चव्हाण आमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही म्हणून त्यांना अटक केली, असा दावा ईडी करू शकत नाही.

कबुली जबाबासाठी तपास यंत्रणेला संशयित आरोपीची कोठडी घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.