पृथ्वीला शॉक; गुडघ्याच्या दुखापतीमुळे वन डे कपमधून बाहेर

25 महिने हिंदुस्थानी संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉच्या धडाकेबाज फलंदाजीला दुखापतीचा जबर शॉक बसला. डरहॅमविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित वन डे कपमधून बाहेर पडावे लागले आहे.

आयपीएलमधील अपयशी फलंदाजी विसरून सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन डे कपमध्ये पृथ्वी शॉच्या धडाकेबाज फलंदाजीने इंग्लंडचेच नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचेही लक्ष आपल्याकडे वळवले होते. पण त्याच्या या वेगवान खेळाला दुखापतीने मोठा ब्रेक दिला आहे. रविवारी डरहॅमविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उर्वरित स्पर्धा मुकावी लागली आहे. त्याच्या दुखापतीमुळे नॉर्थम्पटनशायरलाही जबर धक्का बसला आहे. त्याने अल्पावधीतच या काउंटी संघाला आपल्या प्रेमात पाडले होते. केवळ चार वन डे खेळलेल्या पृथ्वीने 429 धावा ठोकत स्पर्धेत फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्याने समरसेटविरुद्ध 153 चेंडूंत 244 धावांची विक्रमी खेळी करत आपल्या धावांची भूक दाखवली होती. त्यानंतर त्याने नाबाद 125, 26 आणि 34 अशा खेळ्या केल्या होत्या.

– आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीमुळे पृथ्वीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. त्यामुळे इंग्लिश काउंटी खेळण्यासाठी पृथ्वी इंग्लंडला आला. त्याच्या धडाकेबाज शतकी खेळीनंतरही त्याचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी विचार करण्यात आला नाही. त्यातच आताच्या दुखापतीमुळे त्याला किती काळ विश्रांती करावी लागणार, याबाबत अद्याप कसलीही माहिती नाही. मात्र तो लवकर बरा झाला तर त्याला ऑक्टोबरमध्ये सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळता येईल. तरच त्याची इराणी करंडकासाठी शेष हिंदुस्थान संघात निवड होऊ शकेल. या स्पर्धांमधील त्याच्या कामगिरीवरच त्याच्या हिंदुस्थानी संघातील पुनरागमनाचे भवितव्य अवलंबून असेल.