जालना घटनेचा निषेध म्हणून श्रीगोंदा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन

जालना जिल्हयातील अंतराली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या निष्पाप आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज, धुराचे नळकांडे फोडून हवेत गोळीबार केला. त्याचा निषेध म्हणुन सकल मराठा समाजाने पाठींबा देत सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीगोंदा येथे केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी प्रमोद झरंगे व सहकाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना निष्पाप महिला, पुरुष व लहान मुले यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला यात अनेक जण जखमी झाले. आंदोलन राज्य सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला म्हणून आज श्रीगोंदा येथे दौंड जामखेड रोडवर सकाळी 10 वाजता सकल मराठा समाज, सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणा बाजी करत राज्य व केंद्र सरकारवर टीका टीपणी करत भाषणे केली. केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत या झालेल्या घटनेची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन कर्त्यानी केली.

या आंदोलनात मा.जि.प अध्यक्ष बाबासाहेब भोस, मा.आमदार राहुल दादा जगताप,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, नगराध्यक्ष शुभागी ताई पोटे, बीआरएस चे घनश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के, झहीर जकाते सह बहुसंख्य तरुण मुले महिला नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी श्रीगोंद्याचे तहसिलदार मिलिंद कुलथे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने अरविंद कापसे, शाम झरे, नाना शिंदे, भारती इंगवले आदींनी निवेदन दिले. यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जालन्यातील घटनेचा निषेध म्हणून तालुक्यातील कोळगाव, बेलवडी, लोणी, विसापूर अशी अनेक छोटी मोठी गावे उस्फूर्तपणे बंद ठेवून विविध समाज माध्यमावर लोकांनी प्रतिक्रिया देत जनतेने तीन चाकी सरकारचा निषेध केला आहे.