जातीवाचक विधान भोवणार, नितेश राणेंविरुद्ध गुन्हा नोंदवा; पनवेल कोर्टाचे पोलिसांना आदेश

प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱयासमोर बेताल विधाने करणाऱया आमदार नितेश राणे यांना पनवेलच्या सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नितेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना ‘दलित’ शब्द वापरून बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या. याबाबत ऍड. अमित कटारनवरे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी नितेश राणे यांच्याविरुद्ध फौजदारी दंड संहितेच्या कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करा, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. शिंदे यांनी पनवेल तालुका पोलिसांना दिले आहेत.

नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानासंबंधी पोलिसांनी तक्रारदार ऍड. कटारनवरे यांचा जबाब नोंदवून घेतला, मात्र नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर ऍड. कटारनवरे यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला, परंतु पुढे कुठलीच कारवाई केली गेली नाही. अखेर ऍड. कटारनवरे यांनी पनवेल सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या अर्जाची गंभीर दखल घेतली आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पनवेल तालुका पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नितेश राणे चांगलेच गोत्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाने पनवेल पोलिसांचीही कानउघडणी केली आहे. पोलिसांनी पक्षपात करताच कामा नये, असे न्यायालयाने बजावले.