शिवसेनेचे धार्मिक, राजकीय उत्सव महाराष्ट्राला दिशा देणार; संजय राऊत यांचा विश्वास

नाशिक शहरात 22 आणि 23 जानेवारी रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी महाअधिवेशनासह भव्य स्वरूपातील राजकीय आणि धार्मिक उत्सव होणार आहेत. ते महाराष्ट्राला दिशा देतील, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांचे शनिवारी नाशिक शहरात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱयाची माहिती दिली. उद्धव ठाकरे हे सोमवारी भगूर येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारकात आदरांजली अर्पण करणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील, श्रीरामपुंड येथे गोदावरीची महाआरती करतील, असे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी 23 जानेवारी रोजी हॉटेल डेमोक्रॉसी येथे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. त्यात नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी असे साधारण सतराशे प्रतिनिधी सहभागी होतील. अधिवेशनातून पुढील दिशा ठरवली जाईल. सायंकाळी खुल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची अतिविराट सभा होईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे दोन्ही भव्य स्वरूपातील धार्मिक आणि राजकीय उत्सव अवघ्या महाराष्ट्राला दिशा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, जीवन कामत, माजी महापौर वसंत गीते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, जगन्नाथ आगळे, भैय्या मणियार, प्रशांत दिवे, वैभव ठाकरे, मसूद जिलानी, अजिम सय्यद आदी हजर होते.

पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विसरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी नाशिकला आले, त्यांनी रोड शो केला. मात्र, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विसरले. भाजपा केवळ राजकीय स्वार्थासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा जप करते, अशी टीका त्यांनी केली. श्री काळाराम मंदिर प्रवेशाच्या लढय़ात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड यांचे फार महत्त्वाचे स्थान आहे. आम्हाला पंतप्रधानांसारखे विस्मरण होणार नाही, असेही ते म्हणाले.

त्यांना प्रभू रामाचे आशीर्वाद मिळणार नाहीत
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येतील लढय़ात फार महत्त्वाचे योगदान आहे. नाशिक ही प्रभू रामांचीच भूमी आहे. यामुळे आम्ही येथे आनंदोत्सव साजरा करू, असे संजय राऊत म्हणाले. श्रीराम मंदिर सोहळ्याची कलाकारांना खास आमंत्रणं दिली गेली, कारण भाजपाला हा फक्त एक राजकीय इव्हेंट करायचा आहे. ठाकरे कुटुंबीयांशी ते जसे वागले तो नतद्रष्टपणा आणि दळभद्रीपणा आहे. भाजपाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळणार नाही, असे ठणकावून सांगितले.

– शिवसेनेने मुंबईत जनता न्यायालयाच्या माध्यमातून यांचे मुखवटे ओरबाडून काढले. त्यामुळेच आता आमच्या प्रमुख लोकांवर कारवाया करणं, धाडी घालणं सुरू आहे. मात्र, या प्रकरणांमधील खरे गुन्हेगार मिंधे गट आणि भाजपात आहेत. ते वर्षा बंगल्यावर दलाली करत आहेत. भाजपा सत्यवचनी आणि श्रीरामभक्त असेल तर सगळ्यांना समान न्याय द्या, असे आव्हानच त्यांनी दिले.