गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेचा वेग मंदावल्याने प्रवाशांची लटकंती, सकाळी अनेकांना कार्यालयात लेटमार्क

western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

पश्चिम रेल्वेने आज सकाळी तांत्रिक कामासाठी सफाळे येथे घेतलेल्या ब्लॉकचा मोठा फटका उपनगरीय लोकल सेवेला बसला आहे. सफाळय़ाच्या ब्लॉकमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱया आणि येणाऱया मेल-एक्प्रेसचे बंचिंग होऊन त्या एकामागे एक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे त्याचा फटका थेट लोकल सेवेला बसला असून सकाळी गर्दीच्या वेळी गाडय़ा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी कामावर निघालेल्या अनेकांची लोकलमध्ये लटकंती झाली. त्यामुळे त्यांना कार्यालयात लेटमार्क लागल्याने ते रेल्वेच्या नावाने संताप व्यक्त करत होते.

पश्चिम रेल्वेने दररोज 25-30 लाख प्रवासी प्रवास करतात. सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्याने आधीच अडखळत चालणाऱया पश्चिम रेल्वेला आज त्यांनीच घेतलेल्या ब्लॉकचा फटका बसला आहे. सफाळे येथील तांत्रिक कामासाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या मेल-एक्प्रेसचा खोळंबा झाला. त्यामुळे डहाणू, विरारवरून सुटणाऱया गाडय़ांवर परिणाम झाल्याने अनेक गाडय़ा विलंबाने धावत असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. या विलंबामुळे सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची लटकंती झाली. याचा परिणाम दुपारपर्यंत जाणवत होता. लोकल गाडय़ा विलंबाने धावत असल्याने विरार, वसई, भाईंदर आणि मीरा रोड स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.