मोदी वापस नही आयेगा हीच गॅरंटी, संजय राऊत कडाडले

फोटो - चंद्रकांत पालकर, पुणे

मोदींच्या सगळ्या गॅरंटीवर एकच गॅरंटी आहे, ते म्हणजे मोदी वापस नही आयेगा. आपल्याला ईव्हीएम मशीन नव्हे तर दुकानच बंद करायचं आहे. तुम्ही ईडी पाठवली तरी आम्ही असेच राहणार आणि ज्या कोठडीत आम्हाला टाकलं त्याच कोठडीत तुम्हाला टाकलं नाही, तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. पुणे येथील जनआक्रोश मोर्चावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पुनरुच्चार करताना राऊत यांनी मोदी सरकारच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी रामलल्लांच्या मोफत दर्शनाचं एकच उत्तर देतात, असं टीकास्त्र सोडताना राऊत म्हणाले की, समोर जे चित्र मी पाहतोय, मोदींच्या सगळ्या गॅरंट्यांवरती एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नही आयेगा. आपल्याला मशीन नाही दुकानच बंद करायचं आहे. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुप्रिया यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरपासून मोर्चा काढला. त्याआधी मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काही झालं तरी तुम्हाला पाडणार’. आमच्या पाडापाडीत पडाल, तर आधी तुम्ही पडाल. इकडे येऊन पाहा, हवा बहुत तेज चल रही है, अजितराव, टोपी उड जाएगी. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा आहे. सहा प्रमुख मागण्या आहेत. किती साध्या मागण्या आहेत. कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरुपी धोरण ठरवावं. खासगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं. बिबट्याचा प्रश्न गेली अनेक वर्षं मी जुन्नरमध्ये ऐकतोय. त्यासाठी अखंड वीजपुरवठा गरजेचा आहे. पीकविमा कंपन्यांच्या लूटमारीला आळा घालायला हवा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे, हे पाच सहा प्रमुख प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे अमित शहांकडे किंवा मोदींकडे गेले असते, तर त्यांनी काय सांगितलं असतं? रामलल्लाका दर्शन फ्री करायेंगे… दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होते. त्यावरही एकच उत्तर आहे, रामलल्लाका दर्शन फ्री करायेंगे. एक लक्षात घ्या, अत्यंत शहाणपणाने आपल्याला विचार करायचा आहे. ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायत पण जिंकणार नाही. नगरपालिका पण जिंकणार नाही. हे जे 400 पार, 300 पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे. आमची महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. आणि भाजपची युती फक्त ईव्हीएम सोबत आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

आपला या मोर्चातील आक्रोश या शब्दावरच आक्षेप असल्याचं म्हणताना राऊत यांनी हा लढणारा महाराष्ट्र असल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, हा जनआक्रोश मोर्चा आहे. पण माझा आक्रोश या शब्दावर माझा आक्षेप आहे. हा महाराष्ट्र लढणारा आहे. या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता या सध्याच्या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पायपुसण्यासारखी पाडून ठेवली आहे. पाय पुसायचे आणि पुढे जायचं. एक काळ होता, आम्ही अभिमानाने सांगत होतो, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले; खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा… आज काय परिस्थिती आहे? आज हा महाराष्ट्र, इथला शेतकरी लुटला जातोय. हा महाराष्ट्र अनेक वर्षं देशाचं पोट भरत होता, मुंबईनं देशाचं पोट भरलं. पण आज या महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग हा गुजरातला पळवला जातोय. गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काही आक्षेप नाही, देशाचा विकास व्हायला हवा. पण जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे, मराठी माणसाच्या भाग्याचं आहे, मराठी माणसाच्या कष्टाचं आहे, ते सगळं एका राज्यात जातंय. आज आणखी दोन उद्योग गेले, एक टेस्ला आणि सिंधुदुर्गमधील पाणबुडी उद्योग. त्यापेक्षा गुजरातला सोन्याने मढवून टाका एकदा, आमचं काहीही म्हणणं नाहीये. मुंबईतलं हिऱ्यांचं मार्केट नेलं. काय काय नेणारात तुम्ही? तुम्ही आमचे उद्योग न्याल आणि पण या मराठी माणसाचं मनगट आणि धैर्य कुठे घेऊन जाल. आम्ही लढू आणि सगळं परत मिळवू. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या पुण्यात ही सभा चालली आहे, त्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून हा महाराष्ट्र उभा केला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि हे तेच पुणे आहे, मराठी माणसावर जे चाल करून आले, त्याची बोटं इथेच लाल महालात छाटली. मराठी माणसाला बोटं छाटता येतात, प्रसंगी अफजलखानाप्रमाणे कोथळा काढता येतो. धैर्य, शौर्य, अभिमान हे आमच्या रक्तात आहे. हिमालयाने साद घातली की महाराष्ट्र धावतो, सह्याद्री धावतो. त्या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले.

‘मी खात्रीने सांगतो, हे सगळं सर्व्हे वगैरे झूट आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, केंद्रात देखील इंडियाचं सरकार येईल. जे वातावरण मी पाहतोय, ते वातावरण अत्यंत आशादायक आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ हा सगळा जुमला आहे. हे सगळं आपल्याला समजलं आहे, आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. नरेंद्र मोदींनी हे विकलं, ते विकलं, देश विकला. पण त्यांनी काही गोष्टी खरेदी देखील केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं, इलेक्शन कमिशन खरेदी केलं, महाराष्ट्रातले खासदार आणि आमदार खरेदी केले. त्यामुळे विकण्यासोबत खरेदी केलं, आणि जे खरेदी केलं त्याच्यावर ते राज्य करताहेत, हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे. हा महाराष्ट्र लढतोय. आम्ही लढायला उतरलो आहोत. आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत, हत्यारं म्यान केलेली नाहीत आणि आमच्या हत्यारांना हात घालण्यासाठी कुणाची माय व्याली नाही. एक हात तलवारीवर आणि दुसरा हात मृत्युच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरत आहोत. काय करणार तुमचं ईडी. ते येऊन गेले, घेऊन गेले, बंद करून गेले. पण आम्ही तसेच आहोत. तसेच राहणार आणि ज्या कोठडीत आम्ही आहोत, त्यात तुम्हाला घालणार, नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही.’ असं आव्हानही राऊत यांनी यावेळी दिलं.