साताऱ्यातील 50 तोळे सोने चोरी प्रकरण, मुख्य आरोपीला राहुरीतून अटक

सातारा जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून 32 लाखांचे 50 तोळे सोने चोरणाऱया टोळीतील मुख्य आरोपीला राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात दोन महिला आणि सराफ यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.

संदिप झुंबर भोसले -काळे (रा. संभाजीनगर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सातारा जिह्यातील सातारा शहर, वडूज, फलटण, कराड, दहीवडी, कोरेगाव या बस स्थानकांवर अनेक प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सातारा पोलिसांनी याप्रकरणी दोन महिला आणि सराफ यांना अटक केली होती; परंतु यामधील मुख्य आरोपी फरार होता.

सदर आरोपी हा रेल्वेने मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी राहुरी रेल्वे स्टेशनवर आल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. संजय ठेंगे यांनी पोलीस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने तत्काळ कारवाई करीत राहुरी रेल्वे स्थानकावरून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, संदिप झुंबर भोसले -काळे असे नाव सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, साताऱयातील गुह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे त्याने मान्य केले. सदर आरोपीला राहुरी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन सातारा जिल्हा पोलीस यांच्याशी संपर्क करून संदिप भोसले याला सातारा जिल्हा पोलीस पथकाच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, राहुल यादव, प्रवीण बागुल, गोवर्धन कदम, प्रमोद ढाकणे, गणेश लिपने, नदीम शेख आदींनी केली.