इंडियाची मुंबईत बैठक; यजमानपद शिवसेनेकडे

केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाही व्यवस्थेच्या विरोधात स्थापन झालेल्या ‘इंडिया’ची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह देशातल्या पाच राज्यांचे मुख्यमंत्री व देशपातळीवरील ‘इंडिया’चे सर्व प्रमुख नेते सहभागी होतील.

‘इंडियन नॅशनल डेव्हलमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स’ अर्थात ‘इंडिया’च्या बैठकीच्या आयोजनाची रूपरेषा ठरविण्यासाठी वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, पक्षाचे नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेनेने घ्यावी आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजनात सहकार्य करतील असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवला.

शिस्तबद्ध आयोजन

पाटणा आणि बंगळुरू येथील दोन्ही बैठकांचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने झाले. मुंबईतही ती शिस्त पाळली जावी यावर या बैठकीत एकमत झाले.

पाच राज्यांचे मुख्यमंत्री

देशातल्या पाच राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होतील. त्याशिवाय अन्य काही माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते राहुल गांधी निमंत्रितांमध्ये आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्थेचा ताण पडू शकतो. त्यामुळे सरकारने सहकार्य करावे यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत होणारी ‘इंडिया’ची ही तिसरी बैठक आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या बैठकीला उपस्थित राहतील. देशात मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात ‘इंडिया’ आघाडी स्थापन झालेली आहे. पाटणा व बंगळुरूतील बैठक यशस्वी पार पडल्यानंतर मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे, असे ते म्हणाले.

– या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांनी ‘इंडिया’च्या बैठकीची माहिती दिली. मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर मुंबईत ही बैठक होत आहे. मुंबईतील ही बैठकही यशस्वी होईल, पूर्ण ताकदीने ही बैठक यशस्वी करू, असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.

बैठकीचा लोगो 

‘इंडिया’चा एक लोगो बैठकीआधी प्रसारित करण्याचा स्वतंत्र कार्यक्रम होणार आहे आणि बैठकीआधी कार्यक्रमाची रूपरेषा नक्की केली जाईल.

असा आहे बैठकीचा कार्यक्रम 

31 ऑगस्टला खास निमंत्रितांसाठी ‘डिनर’चे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. 1 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता ग्रॅण्ड हयातमध्ये ‘इंडिया’ची बैठक सुरू होईल. 3 वाजता बैठक संपल्यावर संयुक्त पत्रकार परिषद होईल.