जिथे जिथे मोदींच्या सभा, तिथे भाजपचा पराभव होतो!

‘केंद्र सरकारच्या धोरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. तो आता मतपेटीच्या रूपाने निश्चितपणे दिसून येईल,’ असे सांगून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी, ‘नरेंद्र मोदींसारखा भ्रष्ट नेता या देशात झाला नाही. जिथे जिथे मोदींच्या सभा होतात, तिथे भाजपचा पराभव होतो,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीच्या सभेसाठी खासदार संजय राऊत हे आज नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षाबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवार यांचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे खासदार राज्याबाहेर आहेत. तर केरळ, नागालॅण्डमध्ये त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळे ते कोणत्या प्रादेशिक पक्षाबद्दल बोलले ते माहीत नाही. प्रादेशिक पक्षाची अस्मिता असते. आपल्या अस्मितेसाठी भूमिपुत्रांचे, स्थानिकांचे प्रश्न मांडले जातात. प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पक्ष संपून गेले,’ असे संजय राऊत म्हणाले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर, तेलंगणा हा प्रादेशिक पक्ष झाला. त्यानंतर त्यांनी त्याचे रूपांतर भारत पक्षामध्ये केले. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले होते की, तुम्ही असे काही करू नका. मात्र, आता तो पक्ष संपुष्टात आला,’ असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. गेली साठ वर्षे प्रादेशिक अस्मितेसाठी लढत आहे. अण्णा द्रमुक असो, नवीन पटनायकांचा पक्ष असेल किंवा बिहार, तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष असेल, हे पक्ष आपआपल्या राज्याच्या अस्मितेसाठी, राज्याच्या अस्तित्वासाठी लढत असतात,’ असे संजय राऊत म्हणाले.

‘शिवसेना कोणत्याही पक्षामध्ये विलीन होणार नाही. तसा प्रश्नच निर्माण होत नाही. आणीबाणीमध्ये ज्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर दबाव होता. त्या वेळेससुद्धा त्यांनी पक्ष विलीन केला नाही. प्रत्येक नेता आपआपल्या पक्षासाठी नेहमी झगडत असतो. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलतात का, हे मला माहीत नाही,’ असे संजय राऊत यांनी सांगितले. ‘महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. देशात, राज्यात अनेक पक्षांच्या विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या, तरी आम्ही राष्ट्रहितासाठी एकमेकांबरोबर आहोत. हा आमचा अजेंडा आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘शिवसेना पक्षाचे चिन्ह, नाव काढले तरी पक्ष उभा राहिला. मोदींना आव्हान आहे, म्हणूनच ते आता राज्यामध्ये फिरत असून, त्यांना 32 सभा घ्याव्या लागल्या. उद्धव ठाकरे यांची त्यांना भीती वाटते, म्हणून त्यांना सभेच्या माध्यमातून फिरावे लागत आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.

मोदी यांनी कालच्या सभेमध्ये हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वक्तव्य केले. त्यावर विचारले असता, संजय राऊत यांनी, ‘मोदींकडे कोणतेही व्हिजन नाही, कोणताच विकासाचा मुद्दा नाही. मोदींनी गुजरातचापण विकास केला नाही. हा बुडबुडा आहे. इतर राज्यांतील प्रकल्प हे लबाडी करून गुजरातकडे वळवले. निकालानंतर विकास काय आहे ते मोदींनासुद्धा कळेल. जर मोदींनी विकास केला असता, तर या निवडणुकीत त्यांना हिंदू-मुस्लिम मुद्दय़ावर मत मागण्याची वेळ आली नसती,’ असे संजय राऊत म्हणाले.

नामांतराविषयी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराविषयी निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. नंतरच्या सरकारने काय केलं हे मला माहीत नाही; पण उद्धव ठाकरे यांनी हे निर्णय हे कायदेशीरदृष्टय़ा घेतले होते,’ असे ते म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले, ‘भाजपने साडेपाचशे कोटी रुपये हे कसायाकडून घेतले. जे गोमास निर्यात करतात, त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले. एकीकडे गोहत्याबंदीचा विषय घ्यायचा व दुसरीकडे पैसे घ्यायचे, हे कसले ढोंग?’ असे म्हणत, ‘रेमडेसिविर असेल किंवा कोव्हिशिल्ड लस असेल, लोक मारले गेलेत ना?’ असा आरोपही त्यांनी केला. मोदी यांच्यासारखा भ्रष्ट नेता या देशात झाला नाही, असा घणाघात करीत, ‘मोदींनी देश कसा विकला, हे 4 जूननंतर तुम्हाला कळेल,’ असा टोला त्यांनी लगावला.

हिंदुत्व यांच्याकडून शिकायचं का?
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘त्यांची लायकी काय! दहा ठिकाणी शेण खाल्लेली माणसं शिवसेनेवर बोलतात. जे मोदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व मानायला तयार नाहीत, जे रामजन्मभूमीबाबत शिवसेनाप्रमुखांचे योगदान मानायला तयार नाहीत, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं का?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल; मतांची टक्केवारी वाढणे संशयास्पद
निवडणूक आयोगाने मतांच्या टक्केवारीत वाढ झाली, असे सांगितले आहे. यावर खासदार संजय राऊत म्हणाले, मतांची टक्केवारी वाढणे ही संशयास्पद बाब आहे. मतदान झाल्यावर आकडा येण्यासाठी थोडा वेळ लागतो, हे आम्हाला माहीत आहे. एक-दीड टक्का मते इकडे-तिकडे होऊ शकतात; पण थेट दहा ते बारा टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होतो. त्यामुळे आता विरोधी पक्ष एकत्रपणे जाऊन राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निकाल लागल्यावर सांगलीबद्दल बोलू
विशाल पाटलांवर अद्यापि काँग्रेसने कारवाई केली नाही, असे विचारल्यानंतर खासदार संजय राऊत म्हणाले, ‘आम्ही जे काही बोलायचे आहे ते निकाल लागल्यावर बोलू. सांगलीच्या निवडणुकीसंदर्भात आमच्याकडे माहिती आलेली आहे. निवडणुकीदरम्यान काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काय काय कामे केली, याचीसुद्धा आमच्याकडे नोंद आहे. आमच्याकडे सर्व माहिती आलेली आहे. निकाल लागल्यानंतर त्याच्यावर बोलू,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.