‘मुंबई श्री’ 9 मार्चला

मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन ‘मुंबई श्री’ येत्या 9 मार्चला अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात रंगणार आहे. मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या या स्पर्धेचे यंदाही न भूतो न भविष्यति असेच दिमाखदार आयोजन करण्यासाठी शरीरसौष्ठव संघटनेने कंबर कसली आहे. मुंबईकर शरीरसौष्ठवपटूसाठी शरीरसौष्ठव खेळातील ऑस्कर असलेल्या या स्पर्धेचे यंदाही दिमाखदार आयोजन केले जाणार असल्याची ग्वाही बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि किट्टी फणसेका यांनी दिली.

फिटनेस फिजिक खेळाडूंनाही ‘मुंबई श्री’चे वेध

फिटनेसची क्रेझ अवघ्या मुंबापुरीत आहे. त्यामुळे सध्याची युवा पिढी मोठय़ा संख्येने फिटनेस फिजिक प्रकाराकडे वळली आहे. या स्पर्धेत केवळ दोनच गट असले तरी या दोन गटांत शंभरपेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. या गटातही खेळाडूंवर रोख बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे, अशी माहिती सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

सुमारे दहा लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव

शरीरसौष्ठवपटूंना श्रीमंत करणाऱया या स्पर्धेत लौकिकानुसार किमान 200 खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज असला तरी खेळाडूंचा प्रतिसाद पाहता हा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. उमेश गुप्ता, उबेद पटेल, संतोष भरणकर, उमेश पांचाळ, अक्षय खोत, विशाल गिजे, विशाल धावडे, अभिषेक लोंढे, संकेत भरम, अमेय नेवगे, अमित साटम, विलास घडवलेसारखे खेळाडू आपले ‘मुंबई श्री’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. गतवर्षी विजेत्याला सव्वा लाखांचे इनाम दिले गेले होते, तर यंदा त्यात 25 हजारांची वाढ करत ते दीड लाखाचे करण्यात आले आहे. तसेच द्वितीय आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे 75 आणि 50 हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाणार आहेत.