संजय सिंह यांच्या सुटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगातून पहिला संदेश, म्हणाले…

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संजोयक अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून पहिला संदेश पाठवला. केजरीवाल यांनी दिल्लीच्या आमदारांसाठी हा संदेश पाठवला आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी हा संदेश वाचून दाखवला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’च्या आमदारांना रोज आपल्या मतदारसंघाचा दौरा करण्यास सांगितले आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “मी तुरुंगात आहे, त्यामुळे माझ्या दिल्लीवासियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. प्रत्येक आमदाराने रोज आपल्या मतदारसंघाचा दौरा करावा आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवाव्यात. मी फक्त सरकारी विभागांचे प्रश्न सोडवायला सांगत नाही, लोकांच्या इतर समस्याही सोडवायला हव्यात. दिल्लीचे 2 कोटी लोकं माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबातील कोणीही कोणत्याही समस्येमुळे दु:खी राहू नये. ईश्वर सर्वांचे भले करो.” सुनिता केजरीवाल यांनी हा संदेश वाचून दाखवला आहे.

दरम्यान, कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. तिथूनच त्यांनी आपला पहिला संदेश पाठवला आहे. याआधी ईडी कोठडीत असतानाही त्यांनी एक संदेश पाठवला होता. सुनिता केजरीवाल यांनी हा संदेश वाचून दाखवला होता.

आपचे 55 आमदार म्हणतात केजरीवालांनी तुरुंगातून सरकार चालवावे