तथाकथित खिचडी घोटाळा, सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली.

कोरोना काळातील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर यात ईडीची एण्ट्री झाली. मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चव्हाण यांनी ईडीला वेळोवळी तपासात सहकार्यही केले होते. त्यानंतरही आज सायंकाळी ईडीचे अधिकारी चव्हाण यांच्या अटकेची कारवाई केली. त्यांना उद्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नेमके काय घडले होते

कोरोना लॉकडाऊनमध्ये ज्यांचे मुंबईत घर नाही अशा मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तेव्हा महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला मान्यता दिली होती. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून खिचडी पुरविण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पालिकेने 52 कंपन्यांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट दिले होते. यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मिंधे सरकार आल्यानंतर याप्रकरणी सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून कारवाई सुरू आहे.

मिंधे गटाच्या संजय म्हशीलकर यांना अभय

या प्रकरणात मिंधे गटाचे सचिव संजय म्हशीलकर यांच्या कंपनीचे नाव असूनही म्हशीलकर यांना तपास यंत्रणांकडून अभय देण्यात आले आहे. म्हशीलकर यांची कोणतीही चौकशी ईडी अथवा मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.