डिकसळमध्ये पाण्याच्या टाकीत मिसळले विष, 10 गावकऱयांची प्रकृती बिघडली

डिकसळ गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञाताने विष मिसळल्याने 10 गावकऱयांना विषबाधा होऊन त्यांची प्रकृती बिघडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, विष मिसळणाऱया व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ गावात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सार्वजनिक पाण्याची टाकी आहे. या पाण्याचा उपयोग गावातील नागरिक व शाळकरी मुले पिण्यासाठी करतात. या टाकीतील पाणी घेतलेल्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना पाणी प्यायल्यानंतर उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने टाकीतील पाणी व वापरासाठी नेलेल्या घरातील पाण्याची तपासणी केली असता, त्यात विष टाकल्याचे आढळून आले. तसेच पाण्याच्या टाकीजवळच विषारी औषधाची रिकामी बाटली आढळल्याने गावात खळबळ उडाली. या घटनेचा तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.