अमित शहा, एस. जयशंकर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; 1.25 लाख डॉलरचं बक्षीस जाहीर

पंजाबमध्ये खलिस्तान्यांना हवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमृतपाल सिंग याच्या नाड्या आवळल्याने विदेशातील खलिस्तानी समर्थक सैरभैर झाले आहेत. विदेशातील हिंदुस्थानी दुतावासांना टार्गेट केल्यानंतर आता खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर केंद्रातील प्रमुख नेते आहेत.

‘शीख फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि हिंदुस्थानने फरार घोषित केलेला दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने पुन्हा एकदा हिंदुस्थानला धमकी दिली आहे. कॅनडामध्ये मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॅनडातील हाय कमिशनर संजय वर्मा यांना दोषी धरले आहे.

पन्नू याने एस. जयशंकर, अमित शहा आणि संजय वर्मा एक पोस्टर जारी करत त्यावर ‘वॉन्टेड’ असे लिहिले आहे. या तिघांचीही सूचना देणाऱ्याला त्याने 1.25 लाख डॉलरचे (जवळपास 1 कोटी रुपये) बक्षिसही जाहीर केले आहे. हे तिघेही खलिस्तान्यांच्या निशाण्यावर असल्याचे त्याने म्हटले आहेत. शीख हत्यार चालवणे विसरलेले नाहीत. आता प्रत्येक गोळीला गोळीनेच प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी पन्नू याने दिली आहे.

कोण आहे पन्नू?

गुरपतवंत सिंग पन्नू हा भूमिगत राहून हिंदुस्थानविरोधी कायवाया करतो. खलिस्तानी चळवळीमध्ये तो सहभागी असून त्यांना पाठबळही देतो. सोशल मीडियावर हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकत खलिस्तान निर्मितीच्या बढायाही तो मारतो. मात्र खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर, अवतार सिंग खांडा यांच्याप्रमाणे आपल्यालाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती त्याला होती. त्यामुळे तो अंडरग्राऊंड झाला होता. केंद्र सरकारने 1 जुलै 2020 रोजी UAPA कायद्यानुसार पन्नू याला दहशतवादी घोषित केले. तसेच पंजाब पोलिसांनी अमृतसर आणि कपूरथळा येथे त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत.

निज्जरची हत्या

कॅनडामध्ये खलिस्थानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हिंदुस्थान सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले होते. एनआयएने त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.