भाजपच्या नगरसेवकांची भररस्त्यात वादावादी, सोलापुरातील प्रभाग-1मध्ये तणावाची स्थिती

शहरातील शेळगी येथे नालासफाईच्या कामावरून भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये भररस्त्यात तुंबळ वादावादी झाली. यावेळी ‘भोंकनेवाले कुत्ते’ आणि ‘स्टंटबाजी करणारे’ असे म्हणत एकमेकांवर शाब्दिक हल्ले करण्यात आले. शेळगी येथील प्रभाग एकचे माजी नगरसेवक आणि आमदार देशमुख यांचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर कारभारी, संजय कणके आणि आमदार विरोधक म्हणून ओळखले जाणारे सुरेश पाटील यांच्यात भररस्त्यात तुंबळ वादावादी झाली. दरम्यान, रस्त्यात आंदोलन करणारे नगरसेवक सुरेश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोमवारी सोलापूर शहर व परिसरात दमदार पाऊस झाल्याने नाले ओव्हरफ्लो होऊन आजूबाजूच्या वसाहतीत पाणी शिरले. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. शेळगी परिसर आणि भवानी पेठ, धोंगडेवस्ती व उड्डाणपुलाजवळील वसाहतीतील नागरिकांना याचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील उड्डाणपुलाजवळ नागरिकांसह आंदोलन करत होते. शेळगी परिसर प्रभाग एकमध्ये येत असून, या प्रभागाचे नगरसेवक हे आमदार विजय देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख, ज्ञानेश्वर कारभारी व संजय कणके हे आहेत.

प्रभागात आंदोलन सुरू असल्याचे कळताच ज्ञानेश्वर कारभारी व संजय कणके यांनी आंदोलनकर्ते सुरेश पाटील यांना ‘स्टंटबाजी’ आणि ‘उपरा नगरसेवक’ म्हणत शाब्दिक हल्ला केला. यामुळे चिडलेल्या सुरेश पाटील यांनी ‘भोंकनेवाले कुत्ते काटते नही, काटनेवाले कुत्ते भोंकते नही’ असे म्हणत प्रतिहल्ला करत रस्त्यावर आंदोलन सुरू केले. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन आंदोलन करणारे नगरसेवक सुरेश पाटील यांना ताब्यात घेतले. यामुळे वाद आणखी चिघळला असून, राजकीय दबावातून सुरेश पाटील यांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. येथील नालेसफाई व दुरुस्तीकरिता आमदार देशमुख यांनी 10 लाख रुपये दिल्याचे सांगण्यात आले; परंतु काम न झाल्यानेच नाला तुंबल्याचा आरोप होत आहे.