पश्चिम रेल्वेची स्थानके होणार पाणीदार! 22 स्थानकांवर लागणार 53 वॉटर वेंडिंग मशीन

रेल्वे प्रवाशांना स्थानकातच पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. त्यानुसार 22 स्थानकांनवर शुद्ध पाण्याच्या वितरणासाठी तब्बल 53 वॉटर वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अल्प दरात रेल्वे स्थानकातच पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून खरेदी कराव्या लागणाऱया रेल नीरच्या जादा दराच्या पाण्याच्या खरेदीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

रेल्वे स्थानकांसह सर्वच फलाटांवर ठिकठिकाणी जलकुंभ आहेत. मात्र जलकुंभाजवळचा परिसर अस्वच्छ असतो. त्यामुळे तेथे जलकुंभाच्या नळाला पाणी उपलब्ध असतानाही प्रवासी ते पिणे टाळतात. परिणामी त्यांना बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागते. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रवाशांना अल्प दरात शुद्ध पाणी मिळावे म्हणून मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार, बोईसर, सफाळे, केळवे, पालघर, डहाणू रोड आदी 22 स्थानकांमध्ये 53 वॉटर वेंडिंग मशीन उभारणार आहे. त्यासाठीचे कंत्राट वृंदावन कॅटरिंग कंपनीला दिले आहे. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत सदरच्या वॉटर वेंडिंग मशीन उभारण्यात येणार आहेत. तसेच पुढील पाच वर्षांपर्यंत सदरच्या मशीन कार्यरत असणार आहेत.

दोन रुपयांना तीनशे मिली पाणी
पश्चिम रेल्वेवर उभारण्यात येणाऱया वॉटर वेंडिंग मशीनच्या माध्यमातून उपलब्ध होणारे तीनशे मिली पाणी दोन रुपयांना मिळणार आहे, तर अर्धा लिटर पाणी तीन रुपयांना, एक लिटरसाठी पाच रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान प्रवाशाला बाटलीसह पाणी हवे असेल तर त्याला एक रुपया जादा मोजावा लागणार आहे.