लाचखोर महिला तलाठ्यासह सहाय्यकाला रंगहात अटक; गुन्हा दाखल

मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी नगर तालुक्यातील शेंडी येथील तलाठी निकीता जितेंद्र शिरसाठ पदावर कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याला तब्बल 50 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये निकिता जितेंद्र शिरसाठ ( 46 वर्ष, पद- तलाठी सजा शेंडी,(वर्ग-3), ता.नगर,जि.नगर), संकेत रणजीत ससाणे ( 26 वर्ष, तलाठी शिरसाठ यांचे खाजगी मदतनीस, रा. निर्मल नगर, तपोवन रोड, नगर) यांचा समावेश आहे. गजराज नगर येथे पैसे घेत असताना पथकाने तलाठ्याला रंगेहात पकडले असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी तलाठी शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगर यांच्याकडे करण्यात आली होती. पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता यातील शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांचेकडे जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी 50,000 लाचेची मागणी करून ती रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार सोमवारी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर, नगर-छत्रपती संभाजी नगर रोड, नगर येथे आरोपी संकेत रणजीत ससाणे याने तक्रारदारांकडून पंचांसमक्ष 50,000 रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ,.प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक,नगर,सहाय्यक सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार राधा खेमनर, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.