Wrestlers vs WFI: ब्रिजभूषण सिंह यांना छळ प्रकरणी दिल्ली न्यायालयाने समन्स बजावले

देशातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने समन्स बजावले आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि धमकावल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणातील आरोपपत्राची दखल घेत दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांना समन्स बजावले. त्यांना 18 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही समन्स बजावले आहे.

2 जून रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर आधारित दोन एफआयआर आणि 10 तक्रारी दाखल केल्या. डब्ल्यूएफआय प्रमुखाविरुद्धच्या तक्रारींमध्ये अनुचित स्पर्श करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.

शहर पोलिसांनी 15 जून रोजी सहा वेळा खासदार राहिलेले ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर अत्याचार करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे), 354A (लैंगिक छळ), 354D, 506 कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक गैरवर्तनाचे सर्व आरोप फेटाळले आहेत, आणि सर्व आरोपांचे खंडन करणारे विधान देखील जारी केले आहे.