गडहिंग्लजमध्ये टस्करचा धुडगूस; दुचाकीस्वारावर हल्ला, मासेवाडी गावातील घटना, नागरिकांमध्ये घबराट

गडहिंग्लज तालुक्यातील मासेवाडी येथे टस्कराने (हत्ती) आज पहाटे धुडगूस घातला. दुचाकीवरून जाणाऱया तरुणावर या टस्कराने हल्ला केला. प्रसंगावधान राखत तरुणाने चालत्या गाडीवरून उडी मारल्याने तो बचावला. मात्र, टस्कराने दुचाकी सोंडेत पकडून भिरकावून दिली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन विभागाने तातडीने या टस्कराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

मासेवाडी येथे गुरुवारी रात्री आकाश नागोजी कापसे हे बंद पडलेला ट्रक्टर दुरुस्तीसाठी सकाळी दुचाकीने महागावकडे जाणाऱया रस्त्याने जात होते. यावेळी बाबू कुपेकर यांच्या घराशेजारील शेतातून टस्कर रस्त्यावर आला. त्याने दुचाकीला धक्का देण्यापूर्वीच कापसे यांनी उडी मारली. त्यानंतर संतापलेल्या टस्कराने दुचाकी सोंडेत पकडून चेंडूप्रमाणे फिरवून भिरकावून दिली, अशी माहिती पोलीस पाटील बबन कुपेकर यांनी दिली.

हत्तीने धुडगूस घातल्याची माहिती समजताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी मासेवाडी गावातील शंकर भैरू पाटील यांनी घरासमोर ठेवलेला पाण्याचा ड्रम टस्कराने सोंडेत पकडून 400 मीटर अंतरापर्यंत उचलून नेला होता. शेतवाडी-जंगल परिसरात वावरणारे हत्ती मानवी वस्तीत येऊन धुडगूस घालू लागला आहे. आता तर माणसावर चाल करून येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. अन्नपाण्याच्या शोधासाठी टस्कर धुमाकूळ घालत आहेत.

टस्कर आक्रमक झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत

आजरा तालुक्यातून गेल्या वर्षी गडहिंग्लज तालुक्यातील दुगुणवाडी, लिंगनूर तर्फ नेसरी परिसरात या टस्कराचे सर्वप्रथम आगमन झाले होते. दुगुणवाडी, लिंगनूर तर्फ नेसरी या दोन गावांच्या मानवी वस्तीत या टस्कराने फेरफटका मारला होता. या परिसरासह मनवाड, तेरणी, हलकर्णी, नौकुड, चिंचेवाडी परिसरातील पिकांचे नुकसान त्याने केले होते. तेरणी गावच्या हद्दीतून हत्तरगीमार्गे राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपापर्यंत हा टस्कर गेला होता. महामार्गानजीक मुक्तपणे संचार करणारा टस्कर पाहून कर्नाटक वन विभागाच्या टीमने त्याला महाराष्ट्राच्या हद्दीत परतवून लावले होते. गडहिंग्लज वन विभागाच्या कर्मचाऱयांनी त्याला जंगलात हुसकावले होते. त्यामुळे शेतकऱयांवरील टस्कराचे संकट टळले होते. त्यानंतर आता 15 दिवसांपूर्वी आजरा तालुक्यातील सुळे, लाकूडवाडी, महागाव यामार्गे गडहिंग्लज तालुक्यातील मांगनूर तर्फ सावंतवाडी या गावच्या हद्दीत या टस्कराचे आगमन झाले आहे. त्याने आता धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे.