Election 2024 : फक्त अस्तित्वासाठी जागा मागणं योग्य नाही; संजय राऊत यांचे निरुपम यांना जशास तसे प्रत्युत्तर

 

Lok Sabha Election 2024 :

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या टिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. वायव्य मुंबईची जागा शिवसेनेला मिळाल्याने नाराज झालेल्या निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली. या टिकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘महाविकास आघाडीत फार कुठे नाराजी आहे, असे वाटत नाही. गेले दोन-अडीच महिने एकत्र बसून चर्चा करून, प्रत्येक जागेचा आणि प्रत्येक विभागाचा विचार करून आम्ही जागावाटप केले आहे. आता मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच. मुंबईत काँग्रेसची पॉकेट्स आहेत. आणि त्यातुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत नाही, हे सत्य स्वीकारले पाहिजे. फक्त आपल्याला अस्तित्व पाहिजे म्हणून एखाद्या पक्षाने कुठे जागा मागावी हे आघाडीत ठीक नाही’, असे Sanjay Raut म्हणाले.

‘हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. मी त्यावर बोलणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते, एखादी जागा मिळायला हवी. मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेकडे एकही जागा नव्हती. त्याच्या आधीही नव्हती. राज्यात काँग्रेसची एकच जागा होती. आज काँग्रेस मला वाटतं 16 जागांवर लढतेय. म्हणजे एका जागेवरून आपण 16 जागा लढणार आहोत. आणि त्यातल्या 10 जागा आम्ही जिंकतोय, काँग्रेसच्या. यामुळे काँग्रेस शरण गेली, असे कसे काय म्हणणार तुम्ही?’, असा सवाल संजय राऊत यांनी केला. काँग्रेस शिवसेनेला शरण गेली. मुंबईत जिथे काँग्रेस 5 ते 3 जागा लढवत होती. तिथे एकच जागा दिली जातेय काँग्रेसला, अशी टीका संजय निरुपम यांनी केली होती. त्याला संजय राऊत यांनी वरिल प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 17 उमेदवारांची घोषणा

‘पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. त्याला काही उत्तर आहे का? आमची रामटेकची जागा. जिथे आमचा विद्यमान खासदार आहे. ही जागा आम्ही आताच जिंकलोय असे नाही. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून रामटेकमध्ये जिंकतोय. सुबोध मोहिते जिंकले एक-दोन वेळा, मग प्रकाश जाधव जिंकले, मग कृपाल तुमाने जिंकले. सातत्याने आम्ही रामटेकची जागा जिंकतोय. आता पूर्व विदर्भातील ती जागा काँग्रेसला हवी आहे म्हणून ती आम्ही काँग्रेसला दिली. आता आम्ही असे म्हणू का की आम्ही तिथे काँग्रेसला शरण गेलो?’, असा टोलाही संजय राऊत यांनी संजय निरुपम यांना लगावला आहे.

गुलामांना मागण्याचा हक्क नसतो, त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात; संजय राऊत यांचा आसूड

‘अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या पाठिशी काँग्रेस का उभी आहे? कारण केजरीवाल आणि सोरेने हे ‘इंडिया’ आघाडीचे घटक आहेत. आणि ईडी ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे राजकीय दबावाखाली विरोधी पक्षांवर कारवाई करतेय, त्या विरुद्ध आम्ही एकवटलो आहोत. हे त्यांना समजायला पाहिजे. आज राहुल गांधी, सोनिया गांधी हे केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या मागे ठामपण उभे आहेत. हे बहुतके काँग्रेसच्या नेत्यांना माहित नसेल तर दुर्दैवं आहे’, असा टोलाही संजय राऊत यांनी निरुपम यांना लगावला. अमोल किर्तिकर यांच्यावर ईडीचे आरोप आहेत. चौकशी सुरू आहे. यामुळे अशा उमेदवाराला मी आणि आपले कार्यकर्ते त्यांना निवडणुकीत मदत करणार नाहीत, असे संजय निरुपम म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी वरिल प्रत्युत्तर दिले.