गुलामांना मागण्याचा हक्क नसतो, त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात; संजय राऊत यांचा आसूड

Sanjay Raut News :

भाजपने राज्यातील 24 उमेदवार जाहीर केले तरी अद्याप मिंधे गट व अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही गटांवर जोरदार आसूड ओढले. ”गुलामांना, आश्रितांना मागण्याचा हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’, असा जबरदस्त घणाघात संजय राऊत यांनी मिंधे व अजित पवार गटावर केला. यावेळी त्यांनी शिवसेनेची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार असल्याची माहिती देखील प्रसारमाध्यमांना दिली.

”शिवसेनेत यादी जाहीर करण्याची प्रथा परंपरा नाही. आमच्या पक्षात संभाव्य उमेदवारांना काम करण्या संदर्भात सूचना दिल्या जातात. महाराष्ट्रात Uddhav Thackeray यांनी शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांना काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आता आपण महाविकास आघाडीत असल्यामुळे तसेच मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करू. उद्दव ठाकरेंनी सर्व उमेदवार निश्चित केलेले आहेत. काँग्रेसने दिल्लीतून बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत. रविवारी शरद पवार व जयंत पाटील मातोश्रीवर आले होते. राष्ट्रवादीचीही पूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांच्याकडून समजले. महाविकास आघाडीत एखाद्या जागेवरून मतभेत, संघर्ष तणावाचं चित्र अजिबात नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

‘बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू’

”वंचित बहुजन आघाडी हा आघाडीतला महत्त्वाचा व सन्माननीय घटकपक्ष आहे. आंबेडकर सगळ्यांचे नेते आहेत. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. महाआघाडीत जागावाटप करताना थोडंस मागेपुढे होतं. आम्ही त्यांना चार जागा देऊ शकतो. त्यात अकोला व इतर तीन जागा आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावरून असे वाटते की त्यांना चार जागांचा प्रस्ताव मान्य नाही. तरिही आम्ही बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू. चर्चेची आमची तयारी आहे. आम्हाला वंचित बहुजन आघाडी महाविकासआघाडी सोबत हवी आहे तसंच महाविकास आघाडीसोबत आपण राहायला हवं ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची देखील आहे. त्याबाबतीत त्यांनी कोणताही संकोच ठेवलेला नाही. महाराष्ट्रात आपल्याला एकत्र काम करायचं आहे आणि हुकुमशाही संपवायची आहे हाच आमचा प्लान आहे. ”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’

भाजपने राज्यातील 24 जागांवर उमेदवार जाहीर केले तरी अद्याप अजित पवार गट व मिंधे गटाच्या जागा निश्चित झालेले नाही. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी दोन्ही गटाला जोरदार टोले लगावले, ”महायुतीतील भाजपच्या सर्व जागा निश्चित होऊन जाहीर झालेल्या आहेत. मांडलिक, आश्रितांना मागण्याचा अधिकार व हक्क नसतो. गुलामांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो. मातोश्रीवर बसतो, सिल्व्हर ओकवर बसतो. आम्हाला उठसूट दिल्लीला जाऊन लॉनवर रुमाल टाकून बसावं लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

‘सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने जिकंणार’

महादेव जानकर महायुतीसोबत जाणार असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत सुप्रिया सुळे या बारामतीतून प्रचंड मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ”महादेव जानकर भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजप माणसांना गळालाच लावतात. स्वत:हून कुणी जात नाही. महादेव जानकरांबाबत मी काही बोलू नाही. पण बारामतीतून सुप्रिया सुळे या विक्रमी मताधिक्याने जिंकून येतील या विषयी आमच्या मनात शंका नाही. मी स्वत: बारामतीमध्ये तीन जाहीर सभा केल्या आहे. वेळ लागली तर उद्धव ठाकरे बारामतीत जाऊन सभा घेतील. कुणीही येऊ द्या. सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने जिंकून येतील. ते ठरलेलं आहे. त्यामुळे तिथून लढायला कुणी तयार नाही. त्यामुळे लोकांना गळाला लावायचं प्रयत्न सुरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले.