महापालिका आरे स्टॉल पुन्हा बांधून देणार, महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या पाठपुराव्याला यश

भांडुपमध्ये एस वॉर्डमधील पालिका अधिकाऱयांनी 40 वर्षे जुने आरे सरिताचे तोडलेले स्टॉल पुन्हा बांधून देण्यात येईल, असे आश्वासन पालिका अधिकाऱयांनी दिले. त्यामुळे केंद्रचालक संजय बाबर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र दूध वितरक सेनेने यासाठी दूध योजनेचे महाव्यवस्थापक यांच्यासह पालिकेच्या एस विभागाच्या वॉर्ड अधिकाऱयांकडे पाठपुरावा केला होता.

मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डमधील अधिकाऱयांनी कोणतीही लेखी किंवा मौखिक पूर्वसूचना न देता भांडूपमधील 40 वर्षे जुने आरे सरिता केंद्र 26 एप्रिलला तोडले. याबाबत महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दुग्ध व्यवसाय विभाग आयुक्त, बृहन्मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक यांच्यासह पालिकेच्या एस विभागाचे विभाग अधिकाऱयांनादेखील निवेदन दिले होते. स्टॉल पुन्हा बांधून द्या किंवा सरकारी नियमानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. परीरक्षण विभागाच्या अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱयांबरोबर झालेल्या बैठकीत वॉर्ड अधिकाऱयाने ती मान्य करत लाकडी स्टॉल पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी साहाय्यक आयुक्तांना कार्याध्यक्ष राम कदम, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सहचिटणीस प्रसाद नार्वेकर, अनिल आगळे, संजय बाबर यांच्यासह केंद्रधारक उपस्थित होते.