नगर जिल्ह्यात तीन वर्षांत 1861 बालकांचा मृत्यू, अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे 73 मातांनीही गमावले जीव

प्रातिनिधीक फोटो

गरोदर माता व बालमृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. कोट्यवधींचा खर्चही केला जातो. मात्र, तरीही नगर जिल्ह्यातील माता व बालमृत्यूंचा आकडा चिंताजनकच आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 1861 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर अपुऱया आरोग्य सुविधांमुळे 73 मातांनीही आपला जीव गमाविल्याचे आकडेवारी सांगत आहे. गर्भवती मातांचे मृत्यू रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी बालमृत्यूची आकडेवारी आरोग्य विभागाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

शासनाकडून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’तून महिलांना बाळंतपणापूर्वी व बाळंतपणानंतर 5 हजारांची दोन टप्प्यांत मदत दिली जाते. ‘जननी सुरक्षा योजने’तून हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झाल्यास 700 ते 500 रुपये दिले जातात. ‘जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमा’तून गरोदरपणातील आवश्यक तपासण्या मोफत केल्या जातात. 102 या टोल फ्री क्रमांकावरून गरोदर मातेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध केली जाते, तर आदिवासी भागात ‘मातृत्व अनुदान योजने’मधून गरोदर महिलांना आरोग्य सेवासुविधा पुरविल्या जातात. मात्र, अजूनही खेडोपाडय़ांतून आरोग्य सुविधा पोहचल्या नाहीत. त्यामुळे अनेकदा उपचारांमध्ये अडचणी निर्माण होतात. गरोदर मातांना तसेच बालकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्तच आहे.

गरोदर मातांच्या मृत्यूची कारणे

गरोदरपणातील आरोग्य तपासणी न करणे, वैद्यकीय सल्ला न घेणे, घरीच बाळंतपण करणे, याशिवाय अतिरक्तस्राव होणे, रक्तातील आवश्यक घटकांची उणीव, अचानक वाढलेला रक्तदाब, प्रसूतीनंतरचा जंतुसंसर्ग इत्यादी कारणांमुळे 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन आर्थिक वर्षांत 73 गरोदर मातांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.

बालमृत्यूची कारणे

जन्मजात व्यंग असणे, न्यूमोनियासह अन्य आजारांची बाधा होणे, कमी दिवसांचे बाळ जन्माला येणे इत्यादी कारणांमुळे 0 ते 5 वयोगटातील बालकांचा मृत्यू होतो. यात प्रामुख्याने 0 ते 1 वयोगटातील बालकांच्या मृत्यूचा आकडा अधिक आहे. अशाप्रकारे वरील तीन वर्षांत 1861 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

जिल्ह्यात माता-बालमृत्यूचा दर कमी आहे. मात्र, तो आणखी कमी करण्यासाठी सीईओंच्या मार्गदर्शनात लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच गरोदरपणात महिलांनी वेळोवेळी तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी. संतुलित आहार घ्यावा. काही त्रास जाणवल्यास तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.