‘मोक्का’ कारवाई झालेल्या दोन गुन्हेगारांना 8 वर्षे सक्तमजुरी

 ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झालेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. आर. आवटी यांनी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 10 लाख रुपये दंड ठोठाविला आहे. किसन श्यामराव काळे, लखन ऊर्फ लक्ष्मण लक्या काळे अशी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची नावे असून, यांतील तिसरा आरोपी दीपक नागनाथ धोत्रे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या खटल्याची हकीकत अशी की, कोंडीफाटा येथील गोपीनाथनगर येथे राहणारा संजय अमिरका गुप्ता याला व त्याच्या पत्नीला घटनेच्या दिवशी मध्यरात्री दोनच्या सुमारास किसन काळे, लखन काळे, दीपक धोत्रे (रा. चिंचोळ काटी, ता. मोहोळ) यांनी काठी व तलवारीने मारहाण करून लुटले होते. हे सर्व आरोपी अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर पूर्वी 19 गुन्हे दाखल आहेत, तर किसन काळे व लखन काळे या दोघांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात

आली होती.

या टोळीने शेजारी राहणारे दत्तात्रय अंबादास गवळी यास मारहाण करून त्याची दुचाकीसह रोख रक्कम चोरून नेली. श्रवणकुमार प्रयाग यादव याची 10 हजार रोकड, मोबाईल, घडय़ाळ असा 39 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल मारहाण करून नेल्याची फिर्याद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. यांतील मुख्य फिर्यादी संजय गुप्ता याचे कबाडचा व्यवसाय असून, तो यांतील दोन आरोपी किसन काळे, लखन काळे यांना ओळखत होता.

पोलिसांनी तपासात चोरीतील दुचाकी व अन्य मुद्देमाल जप्त करून तिघांनाही अटक केली होती. यात 18 साक्षीदार तपासण्यात आले. मुख्य फिर्यादी गुप्ता हा फितूर झाला होता; परंतु दत्तात्रय गवळी, रिता गुप्ता, चंदू गावडे, लक्ष्मण ढगे यांच्यासह तपास अधिकारी व पोलिसांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने किसन काळे व लखन काळे या दोघांना ‘मोक्का’अंतर्गत आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी पाच लाख रुपये असे 10 लाख रुपये दंड ठोठावला व तिसरा आरोपी दीपक धोत्रे याची निर्दोष मुक्तता केली. यात सरकारी पक्षातर्फे ऍड. देशपांडे यांनी काम पाहिले.