राहुल गांधी यांना न्यायालयाकडून दिलासा, मानहानीप्रकरणात जामिन मंजूर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुलतानपूर न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. आज मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी सुलतानपूर न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला आहे. सुनावणी असल्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला काही तासांचा ब्रेक लागला होता. राहुल यांनी 2018 मध्ये बेंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यावर भाजप नेत्याने तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणी आज राहुल गांधींना हजर करण्यात येणार आहे.

याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहीलेय की, राहुल गांधी यांनी 20 फेब्रुवारी रोजी सुलतानपूरातील उत्तर प्रदेश जिल्हा न्यायालय़ात उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केला आहे. ही घटना 4 ऑगस्ट 2018 रोडी एका भाजपच्या नेत्याने दाखल केलेल्या मानहानी याचिकेसंदर्भातील आहे. भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी सकाळी थांबेल आणि दुपारी 2 वाजता अमेठीच्या फुरतसतगंजहून रायबरेली यात्रेला सुरुवात होईल. याचिकाकर्ते विजय मिश्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी बंगळुरुमध्ये केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप लावला होता की, ते खूनी आहेत. जेव्हा मी हे आरोप ऐकले तेव्हा फार वाईट वाटले. कारण मी 33 वर्ष भाजप पक्षासाठी काम करत आहे, हे माझ्या वकिलाच्या माध्यमातून झाले आहे आणि जवळपास पाच वर्षे सुरु आहे. विजय मिश्रा यांच्या वकिलाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे गोळा करून दाखविल्यास त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. राहुल गांधींच्या विधानाच्या चार वर्षांपूर्वी अमित शहा यांची मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 2005च्या बनावट चकमक प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी अमित शहा गुजरातचे गृह राज्यमंत्री होते.

वृत्तानुसार, आसाम पोलीस राहुल गांधींना समन्स पाठवण्याची तयारी करत आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा गेल्या महिन्यात गुवाहाटीत दाखल झाली तेव्हा झालेल्या संघर्षाच्या संदर्भात समन्स पाठवले जाऊ शकतात. राहुल गांधींसोबतच केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, श्रीनिवास बीवी, कन्हैया कुमार, गौरव गोगोई, भूपेन कुमार बोरा आणि देबब्रत सैकिया यांसारख्या काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची नावे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहेत.23 जानेवारी रोजी राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेड्स तोडले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या चकमकीत अनेक पोलीस आणि पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले.