बावनकुळेंनी शरद पवारांना अक्कल शिकवण्याची गरज नाही!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उंची कमी असली तरी ते एका मोठय़ा पक्षाचे पदाधिकारी आहेत. इतक्या मोठय़ा पदावरील माणसाने त्या पदाला शोभेल असे वक्तव्य करावे. बावनकुळे यांनी शरद पवार यांना अक्कल शिकवण्याची गरज नाही, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिला.

आमच्या पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हे शरद पवार यांना सोडून भाजपच्या सत्तेत सामील झाले आहेत. त्यांचे सध्या वेगळय़ा पद्धतीने राजकारण सुरू आहे, पण शरद पवार हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन सर्व ठिकाणी जात आहेत. कुठे सभा घ्यायची तो आमच्या पक्षाचा अधिकार आहे, असे देशमुख म्हणाले.

शरद पवार यांचा पह्टो बॅनरवर वापरू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, आपला पह्टो वापरला तर कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला होता. पण तरीही त्यांचे पह्टो वापरले जात होते. शरद पवारांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पंडित नेहरूंची दूरदृष्टी

चांद्रयान-3 मोहिमेवरून श्रेयाची लढाई सुरू झाल्याकडे लक्ष वेधले असता, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 50-60 वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून ‘इस्रो’, ‘टीआयएफआर’, ‘आयआयटी खरगपूर’, ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स काऊन्सिल फॉर साइंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्च’, ‘भेल’सारख्या संस्था उभ्या केल्याची आठवण देशमुख यांनी भाजप नेत्यांना करून दिली.