दृष्टिक्षेप 2023 -‘हाऊसफुल्ल’ मनोरंजन

>>प्रा. अनिल कवठेकर

2023 हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी कोरोनाकाळाच्या तुलनेत नक्कीच आशादायी ठरले असे म्हणावे लागेल. मराठी, हिंदी अशा अनेक चित्रपटांनी या वर्षभरात हाऊसफुल्ल व्यवसाय केला. प्रेक्षकांना सर्वतोपरी मनोरंजन दिले. यात नव्या अभिनेत्यांच्या तुलनेत आजही शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार यांचे पारडे जड आहे हे निर्विवाद सत्य आपण मान्य करायला हवे.

‘द वार’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडला टायगर श्रॉफसारखा एक जबरदस्त अॅक्शन हिरो मिळालेला आहे. त्याला समोर ठेवून ‘गणपत’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला, ज्यात काल्पनिक जग होते. जगाचा विध्वंस झालेला आहे आणि सगळी संसाधने काही श्रीमंतांच्या मुठीमध्ये आलेली आहेत आणि त्यांचे एक विश्व तयार झालेले आहे. गरीबांना त्या श्रीमंतांच्या विश्वामध्ये प्रवेश नाही. अर्थात अशा विषयाचा एक इंग्रजी चित्रपट आधीच येऊन गेलेला आहे, पण काल्पनिक विषय असूनही चित्रपटाची मांडणी जितकी डिटेल्समध्ये करायला हवी तितकी न झाल्यामुळे एक चांगला फायटर अॅक्टर असूनही ‘गणपत’ चालू शकला नाही. ‘भूल भुलैया’च्या दुसऱया भागामध्ये अक्षय कुमारला रिप्लेस म्हणून कार्तिक आर्यनने मागच्या वर्षी तो चित्रपट चालवला होता. त्याचबरोबर त्याचा या वर्षी रिलीज झालेला ‘सत्य प्रेम की कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. म्हणजे नवीन स्टार आता बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवायला लागलेले आहेत.

हल्लीचे प्रेक्षक फारच चाणाक्ष व अभ्यासू झाले आहेत. ‘फुकरे’चा तिसरा पार्ट आला आणि त्यांच्या लो बजेटप्रमाणे त्यांना अपेक्षित असणारा बिझनेस या चित्रपटाने केला. चित्रपटात गोष्टीला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच ती गोष्ट सांगण्याच्या पद्धतीला आहे आणि आपली गोष्ट अत्यंत सुंदर, रंजक, मनाला भावेल अशा पद्धतीने सांगणारा विधू विनोद चोपडा त्याचा ‘परिंदा’, ‘थ्री इडियट्स’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ पहा. प्रत्येक चित्रपटातील गोष्ट तो अतिशय सुंदर पद्धतीने मांडतो. अशी की, ती गोष्ट न वाटता तो एक सत्यानुभव वाटतो आणि म्हणूनच कोणतीही मोठी स्टारकास्ट नसलेला ‘बारावी फेल’ हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. आज प्रत्येक तरुणाच्या मनात आयएएस, आयपीएस होण्याचे जे स्वप्न असते, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर येणाऱया अडचणी, संघर्ष, अपमान, जिद्द, त्यातून त्याचं उभं राहणं, जिंकणं सारंच. अशा अनेक सत्यकथांवर आधारित चित्रपट लोकांना खूपच आवडतात. कमल हसन, अनिल कपूरसारख्या अनेक स्टार्सने या चित्रपटाची प्रशंसा केलेली आहे.

‘भगतसिंग’, ‘दामिनी’ यांसारखे अप्रतिम चित्रपट देणाऱया राजकुमार संतोषीचा ‘गांधी विरुद्ध गोडसे -एक युद्ध’ हा विषय घेऊन काल्पनिक कथेवर आधारित चित्रपट. यामध्ये गांधीजींना गोळी लागल्यानंतरही ते जिवंत राहतात आणि ते गोडसेला माफ करतात असा विषय घेऊन गांधी जर जिवंत असते तर काय काय झाले असते, यावर चित्रपट निर्माण केला आणि गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियाने तयार केलेल्या गोडसेमय वातावरणाचा फायदा या चित्रपटाला नक्की मिळेल असे वाटले, पण हा चित्रपट चालू शकला नाही.

‘द कश्मीर फाईल्स’च्या यशाने प्रेरित होऊन विवेक अग्निहोत्रीने ताबडतोब ‘द वॅक्सिन वार’ एन्कॅश करण्याचा प्रयत्न केला, पण कोविडच्या काळामध्ये हिंदुस्थानातील सगळ्या घटना, संपलेली माणुसकी, मेडिसिनमध्ये झालेला भ्रष्टाचार, हजारो मैल पायी गावी जाणारी माणसं, माणसाला पडलेले प्रश्न, सरकारला विचारले जाणारे प्रश्न, सरकारचे अपयश, सरकारचे यश, सरकारने केलेले प्रयत्न, ऑक्सिजनचा तुटवडा, हॉस्पिटलची दुरवस्था, गोळ्यांची दुरवस्था हे काही न दाखवता चित्रपट सत्यापासून खूप लांब गेला आणि डब्ल्यूएचओ विरुद्ध आपला देश. आपल्या देशाचे वैद्यकीय क्षेत्रात खच्चीकरण करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर कसे होत आहेत हे दाखवण्याचा विवेक अग्निहोत्रीचा प्रयत्न सत्यापासून फार दूर नेणारा होता आणि त्यामुळे चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.

चित्रपटात सलमान खान असला म्हणजेच चित्रपट यशस्वी होतो असे काही नाही हे ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटाच्या अपयशाने सिद्ध केलं. आपला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर सलमानने हे मान्य केलं की, कधी कधी आपण अपयशही मनापासून स्वीकारलं पाहिजे, पण सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाने मात्र सलमान खानचे अपयश पुन्हा एकदा धुऊन काढले आणि त्याला पुन्हा त्याच्या मूळ जागेवर नेऊन ठेवले.

मागच्या वर्षी आलेल्या ‘पुष्पा’ या डब चित्रपटाने दाखवून दिले की, प्रेक्षकांना केवळ चिकनाचोपडा, सुंदर दिसणारा नायकच हवा असं नाही, तर अगदी वाकडा चालणारा, मान वाकडी करणारा, केस न विंचरणारा, साधे कपडे घालणारा, नाचता न येणारा, नाचताना पायातील चप्पल जागेवरच ठेवणारा, पण बोलण्यात जरब असणारा असा पारंपरिक नायकापेक्षा वेगळा नायक प्रेक्षक स्वीकारतात. शाहरुख खानने बरोबर ओळखले आणि त्याच्या ‘पठाण’मध्ये शाहरुख खानचा नवा लूक आपल्याला पाहायला मिळाला. आजपर्यंतचा रोमँटिक शाहरुख खान बाजूला होऊन त्या ठिकाणी तगडा, पन्नास-साठ जणांना एकावेळी मारणारा, कोणत्याही प्रकारची आयुधे हाताळणारा, हेलिकॉप्टर उडवणारा, हॉलीवूड चित्रपटातील दणकट नायकासारखा एक नायक शाहरुख खानने आपल्यामध्ये उतरवला आणि त्याच्या असंख्य फॅननी त्याला डोक्यावर घेतले. शाहरुखचा सिनेमा चालू नये म्हणून प्रचंड मोठय़ा प्रमाणात नकारात्मक प्रचार करण्यात आला. भगव्या रंगावर वादळ उठवले, पण यावर शाहरुख खान काहीच बोलला नाही. इतक्या सगळ्या नकारात्मक वादळानंतरही ‘पठाण’ तुफान चालला.

त्यानंतर ‘जवान’ आला, जी चूक विवेक अग्निहोत्रीच्या ‘वॅक्सिन वॉर’मध्ये करण्यात आली होती, ती चूक जवानमध्ये नव्हती. ‘जवान’मध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात सिस्टीमविरोधात जो संताप भरलेला आहे, तो सगळा संताप संवादातून, अभिनयातून शाहरुख खानने पडद्यावर सादर केला. ते संवाद म्हणजे प्रत्येक देशाच्या मनातील सिस्टीमविरुद्धच्या भावना होत्या. याही चित्रपटात शाहरुख खानने आपला लुक बदलला. संपूर्ण टक्कल असणारा नायक, चेहऱयाला बँडेज केलेला नायक प्रेक्षकांना खूपच आवडला. त्याच्यासारखं चेहऱयाला बँडेज लावून लोक चित्रपट पाहायला गेले आणि जे रेकॉर्ड ‘पठाण’ने केले तेच रेकॉर्ड ‘जवान’ने मोडले. या तिन्ही चित्रपटांनी पुन्हा एकदा सिनेमागृहे जागृत केली, बॉलीवूडला एक नवसंजीवनी दिली. शाहरुख खानचा ‘डंकी’ याच महिन्यात रिलीज होणार आहे. पाहू या, तो आणखी कोणते नवे रेकॉर्ड निर्माण करतोय ते! उत्तम कथांचं प्रेक्षक स्वागत नक्कीच करणार!