अन्नाशी नाते…

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

चांगले आणि आरोग्यदायी नाते हे आपल्या आयुष्याला पूरक असते. नाते खराब झाले तर कितीही नाही म्हटलं तरी त्याचा नकारात्मक परिमाण आपल्या शरीरावर आणि मनावर होतच असतो. आपले आणि अन्नाचे असेच एक सुयोग्य नाते असणे गरजेचे असते. हे नाते आपल्याला आरोग्यसंपन्न करते. अन्नाशी उत्तम नाते कसे प्रस्थापित करावे हे आपण आज जाणून घेऊयात.

– अन्नपदार्थांना चांगले किंवा वाईट तोलू नका ः कुठलेही अन्न पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असे नसते. जसे की, समोसा तेलकट म्हणून अत्यंत वाईट आणि कधीच खायचा नाही आणि फळ चांगले म्हणून सतत फळच खात सुटणे हेदेखील चुकीचे. अति परिचयात अवज्ञा असे चांगल्या नात्यात होतेच, पण कोणी आवडत नाही म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला पूर्ण टाळणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही.

खऱ्या भुकेची प्रतीक्षा करा – दुसरे म्हणजे खरी भूक असेल तेव्हाच अन्न ग्रहण करावे. खरी मनापासून भूक लागणे हे खरे तर उत्तम आरोग्याचे लक्षण! त्यावेळी पाचक रसदेखील अधिक कार्यक्षम झालेले असतात.

सावकाश चाऊन खावे – कुठल्याही चांगल्या नात्यात हळूवारपणा असतो आणि प्रेम असते. तेच प्रेम प्रत्येक घासावर करावे. एक एक घास गोडीने आणि मनापासून खावा. आपल्या तोंडातील लाळेत पाचक रस असतात. त्यामुळे पचन तिथे सुरू होते. यामुळे सावकाश चावून खाल्ल्यास अन्नाशी नाते आधीपासूनच घट्ट होते.

लक्ष द्या, वेळ द्या – कुठलेही नाते असो, आपण त्याला दर्जात्मक वेळ दिला पाहिजे. म्हणजेच खात असताना केवळ खाणेच! आपण एकीकडे खातोय आणि एकीकडे टीव्ही बघतोय किंवा वाचतोय असे झाले की अन्नाकडे अर्धवट लक्ष देतोय असे होते, तर पूर्ण लक्ष द्या.

वाया घालवू नका – आपल्याला मिळते ते सगळय़ांनाच मिळते असे नाही. त्यामुळे जे काही मिळते त्याला महत्त्व द्या. ते वाया घालवू नका.

अति तिथे माती – कुठलाही नात्यामध्ये अतिरेक झाला तर तो वाईटच. त्यामुळे खाण्याचा पण अतिरेक करू नका?

ठामपणा हवा – कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही घटना आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. ठाम राहणे, नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे.

सकारात्मक दृष्टिकोन असू द्या – कुठल्याही नात्याकडे बघताना सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यक आहे. जर आपण एखादा पदार्थ खाताना हे खाल्ल्यानंतर मला त्रास होणार आहे असा विचार केल्यावर तो त्रास होणारच. त्यामुळे खाताना सकारात्मक विचार करा

अपमान करू नका – कुठल्याही नात्याचा अपमान करू नये. तसेच अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. त्याच्यातूनच आपल्या पेशींची निर्मिती होत असते. म्हणूनच त्याचा अपमान करणे हे खूप चुकीचे आहे.

आभार माना – आपण मानले पाहिजे. तसेच प्रत्येक घास खाताना आपण शेतकरी, किराणा मालवाला, अन्न शिजवणारा या सगळय़ांचे आभार मनामध्ये मागितले पाहिजे