कवडसे – बंधन

>> महेंद्र पाटील

शिशिराची पानगळ संपून वसंत सुरू झाला होता… आठवणींचे ओले ऋतू डोळ्यातून पाझरून गेले होते. संध्याकाळही हळूहळू विरून जात होती. रात्र आपलं अंग पसरू लागली होती. चांदण्या जमा होऊ लागल्या होत्या. चंद्रमा मंद प्रकाश पसरू लागला होता. सारा आसमंत भारलेला वाटत होता. माझं मन मात्र वेगळ्याच विचारात गुंतलं होतं. मला वाटत होतं की, कोवळी उन्हं जेव्हा पहाटे माझ्या अंगणी येतील तेव्हा त्यांचं कोवळं रूप पाहून मन हरखून जाईल. मला वाटत होतं की तिने त्या कोवळ्या उन्हांत असंच समोर उभं राहावं. पण ती पहाट तशी समोर येतच नाही. कारण तिच्यानंतर येणारी दुपार त्या पहाटेचं अस्तित्व पुसून टाकत असते. त्यामुळे पहाटेला विरून जावं लागतं.

पण मग दुपार आली की, मन पुन्हा झाडांच्या गर्द सावलीत शांत होतं. त्या सावलीला नाहीसं करणारी संध्याकाळ हळूहळू येते आणि मग ती दुपारसुद्धा विरून जाते. या सृष्टीतले सगळे प्रहर एका मागोमाग येतात आणि एकमेकांच अस्तित्व हिरावून स्वत पसरू लागतात. पण ही गोष्ट मनाला कळत नाही. मन फार हट्टी असतं. त्याला ते प्रहर जपून ठेवायचे असतात. सुंदर रात्र, सुरंगी संध्याकाळ, कोवळी उन्हं, निसटती दुपार, झाडांची सावली, पाखरांचा किलबिलाट…

पण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला एक बंधन आहे. वेळेचं आणि ऋतूचं! त्याप्रमाणेच सगळे प्रहर येतात आणि जातात. निसर्ग अमर्याद असला तरी त्याहून अमर्याद आपलं मन असतं. कारण निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू येत-जात असले आणि त्याप्रमाणे प्रहरसुद्धा बदलत असले तरी मनाला हवा तेव्हा, वाटेल असं त्या ऋतुंना अनुभवता येत असतं. पावसाळी रात्री कधी मनाला दूर घेऊन गेल्या तरी जुन्या आठवणींचं गाव मात्र भर पावसातही ग्रीष्माच्या झळा जाणवून देतात मनाला… कधी वैशाखात आपलं मन कुणाच्या तरी विचाराने श्रावणसरी झेलू लागतं. मनाला कसलंच बंधन नसतं. ते कसंही वागतं. काही विचार न करता जगतं. असं आयुष्य आपल्या बुद्धीला जगता येत नाही. नाहीतर खूप गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या या जगात. पण त्यामुळे जो तो आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागला असता. मग कसलाच अर्थ उरला नसता आयुष्याला… नदीसुद्धा तिच्या मनासारखं वागू लागली असती आणि पाऊसही बरसू लागला असता. कधीही… कसाही… केव्हाही… रात्र कधीही आली आणि गेली असती. दिवस कधीही उगवला असता आणि मावळला असता. पण असं होत नाही, कारण त्यांना बंधनं आहेत. ही सारी बंधनं तोडता येतात ती मनाला. म्हणून मन बुद्धीच्याही पलीकडे जाऊन विचार करू शकतं आणि त्याच्या या स्वभावामुळेच मनाला चंचल, लहरी म्हटलं जातं. पण त्याची पर्वा मनाला कुठे असते? त्याला फक्त ठाऊक असतं कल्पनेच्या आभाळात स्वच्छंदपणे बागडणं. जिथवर जाता येईल तितकं दूर दूर जाणं. समोरच्या मनाच्या तळाशी शिरून त्याच्या अंतरंगात बुडून जाणं. म्हणूनच ते बेफिकीरपणे आजपर्यंत कुणाचंही बंधन न जुमानता जगत आलंय. सगळ्या गोष्टींना बंधनं असतात. मनाला कधीच बंधनं नसतं. फक्त दुसरं वेडं मन त्याला बंधनात टाकू शकतं. ते बंधन असतं काही क्षणांचं, काही दिवसाचं, काही वर्षांचं तर कधी काही जन्माचंही असू शकतं. अशाच मनाच्या शोधात प्रत्येक मन असतं. आपल्यापेक्षाही दूर जाऊ शकणारं मन जेव्हा त्या मनाला भेटतं तेव्हा ते मन त्यासोबत अलगदपणे निघून दूरच्या प्रवासाला जातं.

शेवटी मनाला एकच गोष्ट हवी असते. या सृष्टीतली, या जगातली, आसमंतातली सारी कुंपण तोडून जमेल तितकं दूर जाण्याची. दुसऱया मनाचा आधार घेऊन जायचं झालं तरी त्याची तयारी असते. म्हणूनच दोन मनं जेव्हा जवळ येतात तेव्हा ती एका मोठय़ा प्रवासाची नांदी असते.