केस अकाली पांढरे होताहेत…

 

 >>मृणाल घनकुटे

अलीकडे तरुण वयोगटातील मुलामुलींचे केस पांढरे होतात. केस पांढरे दिसू लागले की, केसांचे सौंदर्यदेखील नाहीसे होते. पांढरे केस सहसा आवडत नाहीत.  केस काळे ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अशाच काही उपायांबाबत डर्मटोलॉजिस्ट डॉ. दीपम शाह यांनी दिलेली माहिती…

 

केसांचा रंग का बदलतो?

वयाच्या 30 च्या आत केस पांढरे होणे ही आजकाल सर्दी-खोकल्या इतकीच सामान्य गोष्ट झाली आहे. केस पांढरे होण्यासाठी काही विशिष्ट वय राहिलेले नाही.आहारामधील पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे  केसांच्या मुळांशी असलेल्या पेशी रंगद्रव्य तयार करण्याचे थांबवतात तेव्हा  केस पांढरे होऊ लागतात. जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूडच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे केसांची मुळे काळी पडणारे मेलेनिन रंगद्रव्य कमी होऊ लागते. काही पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात.

 झोप न लागणे, अति ताणतणाव, प्रदूषण आदींमुळे मेलेनिन रंगद्रव्यावर परिणाम होतो. कमी वयामध्ये केस पांढरे होणे म्हणजे तणावाची लक्षणे आहेत. डिप्रेशन, झोपेच्या गोळय़ा वा गरजेपेक्षा जास्त ऑण्टिबायोटिक औषध घेतल्यामुळेही केस पांढरे होतात.

 आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे की, सतत ताणतणावात राहणे, चुकीचा आहार घेणे, व्यसन करणे अशी एक ना अनेक कारणे केस पांढरे होण्याला कारणीभूत असू शकतात.

 शरीरातील ऑण्टिऑक्सिडंटच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात.
ऑण्टिऑक्सिडंट कमी असतील तर शरीरातील फ्री रॅडिकल पेशींना इजा करतात. ज्यामुळे  Vitiligo सारखे आजार उद्भवू शकतात.  Vitiligo  मुळे केस पांढरे होतात. शरीरामध्ये प्रोटिन, लोह, व्हिटॅमिन ‘बी 12’ अशा पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ लागतात.

केसांमध्ये विविध केमिकलयुक्त क्रीम लावल्यास किंवा हेअर कलर केल्यामुळेही केस पांढरे होतात. त्याशिवाय स्ट्रेटनिंग आणि कार्ंलग मशीनचा जास्त उपयोग केल्यास केसांना नुकसान पोहोचते आणि केस पांढरे होऊ लागतात.

 काही शारीरिक व्याधींमुळे केस पांढरे होतात. कमी वयात मधुमेह वा थायरॉईडसारखे आजार झाल्यास केस पांढरे होण्याचे कारण ठरते.  Alopecia Areata  मध्ये केस गळतात, टक्कल पडते व नंतर उगवणारे केस बऱयाचदा पांढरे असतात.

आजकाल बाजारात येणारी मेंदी ही केमिकलयुक्त असते. ज्यामुळे तुमचे केस कोरडे होतात. त्याच वेळी डाय तुमचे केस अधिक लवकर पांढरे करतात.

 नशिले पदार्थ, अल्कोहोल, धूम्रपानाच्या अतिसेवनामुळे  केस पांढरे होतात. यापासून दूर राहणेच जास्त चांगले. धूम्रपानामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढते.

केस काळे कसे होऊ शकतात?

 पांढरे केस लपवण्यासाठी मेंदी किंवा रंग वापरले जातात. याचे दुष्परिणाम  नंतर भोगावे लागतात, परंतु पांढरे केस सतत रंगवण्यापेक्षा काळय़ा केसांना पांढरे होऊच नाही दिले तर? जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असलेल्या आहारामुळे आपले केस लवकरच पांढरे होऊ शकतात. आपल्या केसांनी रंगद्रव्ये तयार करणे सुरू ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ‘बी 12’ची आवश्यकता असते. केसांना काळे करणे हे पिग्मेंटेशनवर अवलंबून असते.

 आहारात मसालेदार, आंबट आणि खारट पदार्थ कमी करा. आठवडय़ातून दोन-तीन वेळा डोक्याला व केसांना तेलाचा मसाज करणे, केस वेळच्या वेळी धुणे व हवेतील प्रदूषणापासून, उन्हापासून केसांना सुरक्षित ठेवणे या गोष्टी केस पांढरे न होण्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. एक चांगली जीवनशैली अंगीकारल्यास केसांचे आरोग्य तसेच तुमची तब्येत चांगली राहते.