अशोक गेहलोत यांना दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स, केंद्रीय मंत्र्याच्या मानहानीचं प्रकरण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना 900 कोटी रुपयांच्या क्रेडिट सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांना 7 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

खासदार-आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती हरजीत सिंग जसपाल यांनी हे समन्स जारी केले.

फौजदारी मानहानीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना समन्स जारी करायचा की नाही याबाबतचा आदेश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने यापूर्वी राखून ठेवला होता.

एप्रिलमध्ये, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात दावा केला की मुख्यमंत्र्यांनी आपली बदनामी केली आणि 900 कोटी रुपयांच्या संजीवनी क्रेडिट सोसायटी घोटाळ्यात गुंतल्याचा कथित आरोप केला. शेखावत यांनी दावा केला की राजस्थान सरकारने या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांचे नाव कुठेही आढळले नाही.

शेखावत यांनी गेहलोत यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला चालवण्याची मागणी केली आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या नुकसानीसाठी योग्य आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली.