भुशी धरण ओव्हरफ्लो! लोणावळ्यात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद

लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचे सर्वात आवडतीचे ठिकाण असलेले हे धरण ओसंडून वाहू लागल्याने शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत लोणावळा शहरात एकूण 248 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी देखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण पाच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. स्थानिक युवकांनी शुक्रवारी रात्री धरण ओव्हर फ्लो होण्याच्या बेतात असताना धरणाच्या सांडव्यावरील मोऱ्यांची माती काढत, धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली.

मागील वर्षी जुलै महिन्याच्या 6 तारखेला भुशी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. त्यामानाने यंदा धरण लवकरच म्हणजे 30 जून रोजी ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून फेसळत वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मागील दोन्ही विकेंडला पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती. मात्र त्यावेळी या पर्यटकांचा हिरमोड झाला होता.  या विकेंडला येणाऱ्या पर्यटकांना तो आनंद घेता येणार असल्याने या शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.