डेटिंग साईटच्या माध्यमातून करायचा फसवणूक

डेटिंग साईटच्या माध्यमातून महिलांशी ओळख करून गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱयाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. प्रीतेश दुगलच असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या पैशातून तो मौजमजा करत होता. प्रीतेशला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या महिला आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रीतेशसोबत एका डेटिंग अॅपवरून ओळख झाली होती. प्रीतेशने महिलेला त्याचा नंबर दिला. त्यानंतर प्रीतेश हा मुंबईत आला. मुंबईत त्याने महिलेसोबत एकत्र जेवण केले. तेव्हा त्याने त्याचे खरे नाव निकी सिंग नसून प्रीतेश असल्याचे महिलेला सांगितले. ऑगस्ट महिन्यात प्रीतेश हा महिलेला भेटला. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र तेथे आला होता. भेटीदरम्यान प्रीतेशने महिलेला पुण्यात एक प्लॉट डेव्हलप करत असल्याचे भासवले. त्या प्लॉटमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल अशा त्याने भूलथापा मारल्या. तेव्हा महिलेने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. प्रीतेशने भेटीदरम्यान आपला मित्र बिझनेस लोन मिळवून देतो. त्या लोनचे हप्ते आपण भरू असे त्याने महिलेला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने तिची कागदपत्रे दिली. त्यावर तिला 13 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले.

त्या कर्जाची रक्कम महिलेच्या खात्यात जमा झाली. त्याने त्या पैशातील काही रक्कम स्वतःच्या आईच्या आणि त्याच्या मित्राच्या बँक खात्यांत वर्ग केली. कर्ज काढल्यावर सुरुवातीला एक हप्ता प्रीतेशने भरला. त्यानंतर त्याने लोनचा हप्ता भरला नाही. तो वारंवार महिलेला आणखी पैशासाठी मागणी करत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सोहम कदम, हिरेमठ, गोठमुखले आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना प्रीतेशची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पुणे येथे गेले. तेथून पोलिसांनी प्रीतेशला अटक केली.