चीनमधील गूढ व्हायरसमुळे हिंदुस्थानचे टेन्शन वाढले; 6 राज्यांना अलर्ट

चीनमध्ये न्यूमोनिसारख्या गूढ आजार वाढत आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये प्रसार होणाऱ्या या रोगामुळे जगात कोरोनासारखी महामारी निर्माण होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. त्यातच या गूढ आजाराने हिंदुस्थानचेही टेन्शन वाढले आहे. देशातील 6 राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात राजस्थान, कर्नाटक, गुजरात,उत्तराखंड, तामिळनाडू आणि हरियाणा यांचा समावेश होता.

या राज्यांतील रुग्णालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या रोगाचा सामना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारने राज्यातील जनतेला फ्लूबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे हवामानामुळे होणारा फ्लूची लक्षणे, जोखीम आणि काय करावे, काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे. तसेच जनतेत जनजागृती करण्यासाठी मारग्दर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.कोणीही शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकावे, चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नये, काही अंतराने हात धुवावे तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या राज्यात चिंताजनक परिस्थिती नाही. मात्र, जनतेने आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, तसेच आरोग्य विभागानेही संक्रामक रोगांवर देखरेख ठेवावी आणि त्यांचा फैलाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे म्हटले आहे. तसेच कोणत्याही रोगांचा फैलाव होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच रुग्णालयांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्या, अशा सूचना दिल्या आहेत.

गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी चीनमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोना 19 महामारी काळातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, तसेच आरोग्य यंत्रणांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य यंत्रणांनी सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. उत्तराखंड प्रशासनानेही आरोग्य कर्मचाऱ्यांना साथीच्या रोगांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तराखंडमधील चमोली, उत्तरकाशी आणि पिथोरागड हे चिन्हे चीनच्या सीमेशी जोडलेले आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरियाणातील आरोग्य विभागानेही सार्वजनिक रुग्णालयांना साथीच्या किंवा विचित्र लक्षणे असलेल्या आजारांची नोंद ठेवावी आणि त्याची माहिती सरकारी यंत्रणांना द्यावी, असे म्हटले आहे.

तामिळनाडू सरकारनेही साथीच्या रोगापासून बचावासाठी पावले उचलली आहेत. न्यूमोनियासारख्या लक्षणे असलेल्या आजारांवर लक्ष ठेवावे आणि साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराचा फैलाव वाढल्यास परिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने तयार राहवे, असे निर्देश देण्यात आले आहेत.